
Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतींना चाप बसणार; काय आहे प्रकरण वाचाच?
मंचर - बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना राज्य सरकारच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाने परिपत्रक काढून दिल्या आहेत. यामध्ये गावच्या संस्कृती परंपरेनुसार धार्मिक सण, उत्सव, यात्रा यासाठीच बैलगाडा शर्यतींना परवानगी दिलेली आहे. पण, वाढदिवसानिमित्त शर्यती घेता येणार नाहीत, असे म्हटले आहे. त्यामुळे नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठा गाजावाजा करून भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यतींना चाप बसणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी देताना गुरुवारी (ता. १८) मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनाने बुधवारी (ता. २४) याबाबत पशुसंवर्धन खात्यामार्फत मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार, याबाबतचा तपशील दिला आहे, अशी माहिती अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप बोदगे यांनी दिली. .
राजकीय कार्यक्रम, वाढदिवस यानिमित्त कोणत्याही परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देऊ नये, असे आदेशामध्ये नमूद केले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीला अनेक इच्छुक नेते मंडळी लागले आहेत.
बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून सहज दहा ते वीस हजार लोक जमू शकतात. त्यामुळे नेत्यांनी वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यती भरविण्यासाठी जोर लावला होता. अनेक बैलगाडा घाटांना अद्ययावत करण्यासाठी देणग्या दिल्या जात होत्या. सर्वोच्च न्यायालय व राज्य शासनाच्या परिपत्रकामुळे राजकीय नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे आतापर्यंत तयार केलेल्या तयारीवर पाणी पडणार आहे. परंतु, सर्वसामान्य जनतेने त्याचे स्वागत केले आहे.
नेते मंडळींना चिंता
आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर-हवेली, मावळ व भोसरी विधानसभा मतदारसंघात नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात होते. विजेत्या बैलगाडा मालकांना लाखो रुपयांची रोख रक्कम, मोटरसायकल, बुलेट, फ्रिज, सोन्याच्या अंगठ्या, आदी वस्तू भेट म्हणून दिल्या जात होत्या. त्यातून नेत्यांना लोकप्रियता मिळत होती. पण, आता मात्र राजकीय कार्यक्रम व नेत्यांच्या वाढदिवसाला बैलगाडा शर्यती भरविण्यास परवानगी मिळणार नाही. त्यामुळे नेते व त्यांचे समर्थक कमालीचे चिंतेत पडल्याचे पाहावयास मिळते.