मेट्रो धावली रेऽऽऽ; मोरवाडी ते फुगेवाडी दरम्यान ट्रायल रन

मेट्रो धावली रेऽऽऽ; मोरवाडी ते फुगेवाडी दरम्यान ट्रायल रन

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी चौक. वेळ दुपारी दीडची. रविवार सुटीचा दिवस. त्यामुळे फारसी रहदारी नव्हती. पण, काही रिक्षाचालक चौकात थांबलेले होते. त्यांना मेट्रो मार्गावर धुरळा उडताना व पुण्याकडे जाताना दिसला आणि ‘मेट्रो चालली रेऽऽऽ’ म्हणत सर्वांच्या नजरा मेट्रोमार्गाकडे वळल्या. पिंपरी-चिंचवड महापालिका भवन (मोरवाडी) ते फुगेवाडी अशी सहा किलोमीटर अंतर मेट्रोची ट्रायल रन झाली. त्यासाठी अर्धा तास वेळ लागला.   

पिंपरी-चिंचवड महापालिका भवन (मोरवाडी) ते पुण्यातील स्वारगेट आणि कोथरूडमधील वनाज ते नगर रस्त्यावरील रामवाडी या दोन मार्गांवर मेट्रो धावणार आहे. दोन्ही मार्ग मिळून पुणे मेट्रोच्या कामाने वेग घेतला असून, आत्तापर्यंत ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच, व्हायाडक्‍ट, स्थानके व भूमिगत मार्गांसह वनाज व रेंजहिल्स डेपो उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. दापोडी ते मोरवाडीपर्यंतचा मार्ग पिंपरी-चिंचवड शहरात आहे. या मार्गावरील मेट्रोची पहिली चाचणी गेल्या वर्षी १० जानेवारी रोजी घेण्यात आली होती. त्यावेळी मोरवाडी ते संत तुकारामनगर असे एक किलोमीटर अंतर होते. साधारण वर्षभराने (ता. ३) दुसरी चाचणी घेण्यात आली आणि मोरवाडी ते फुगेवाडी असे सहा किलोमीटर मार्गावर मेट्रो धावली. मेट्रोचे कार्यकारी संचालक डी डी मिश्रा, मुख्य प्रकल्प अभियंता रवी कुमार, संदीप साकले, श्रीराम मांझी, राजा रमण, रवी टाटा आदी अधिकारी आदी उपस्थित होते. 

कोरोनाचा कामावर परिणाम
कोरोना लॉकडाउनमुळे कामगार मूळगावी निघून गेले होते. त्यामुळे जवळपास सात महिने मेट्रोच्या कामाचा वेग कमी झाला होता. गेल्या दोन महिन्यांपासून पूर्वीच्याच वेगाने काम सुरू आहे, अशी माहिती मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

दृष्टिक्षेपात मेट्रो चाचणी

  •      दुपारी दीड वाजता महापालिका स्थानकावरून मेट्रो     सुटली व दोन वाजता फुगेवाडी स्थानकावर पोचली
  •     चाचणीसाठी तीन कोचची मेट्रो वापरली, ती ट्रेन ऑपरेटर चेतन फडके यांनी चालवली  
  •     सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ओएचई तारा २५ केव्ही विद्युत भाराने प्रभावित केल्या होत्या
  •     विद्युत वाहिन्यांची तंदुरुस्ती व ट्रॅकच्या सुरक्षिततेचे निरीक्षण केल्यानंतर चाचणीचा निर्णय घेण्यात आला

पुणे मेट्रोने रिसर्च, डिझाइन स्टॅंडर्डाजायजेशन, कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी आणि रेल्वे बोर्ड यांच्याकडे आवश्‍यक परवानग्या मिळण्यासाठी अर्ज केला आहे. चाचणीची पूर्तता महामेट्रोने पूर्ण केली आहे. आजची चाचणी हा पुणे मेट्रोच्या कामातील महत्त्वाचा टप्पा होता. आजची चाचणी महामेट्रोने केलेल्या अथक प्रयत्नांचे फळ आहे. सर्व पुणेकरांचा पुणे मेट्रोच्या कामात प्रचंड सहयोग लाभला आहे. त्यामुळेच महामेट्रो हे काम यशस्वीरीत्या पुर्ण करू शकते आहे.
- डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com