महामार्गाच्या विकासासाठी दिल्लीत साकडे;आमदार सुनील शेळके यांनी घेतली गडकरींची भेट

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 January 2021

आमदार सुनील शेळके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. गडकरी यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. 

तळेगाव स्टेशन - मावळ तालुक्‍यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित कामांसंदर्भात आमदार सुनील शेळके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सोमवारी (ता.4) निवेदन दिले. गडकरी यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मावळ तालुक्‍यातून जाणाऱ्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग 48 वरील देहूरोड सेंट्रल हॉटेल चौकातील येथील वाय जंक्‍शन आणि सेवारस्ता, सोमाटणे फाटा येथे उड्डाणपूल, तळेगाव विप्रज लिंब फाटा येथे टी जंक्‍शन, उर्से तळेगाव फाटा येथे एक्‍स जंक्‍शन, वडगावजवळील एमआयडीसी फाटा येथे टी जंक्‍शन आणि इतर दोन ठिकाणी उड्डाणपूल, कान्हेफाटा येथे उड्डाणपूल, कार्ला फाटा येथे उड्डाणपूल आदी प्रस्तावित कामांसह सुधारणा कामांची त्वरित अंमलबजावणी करण्याकडे आमदार सुनील शेळके यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले. या कामांसाठी 430 कोटींचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने यापूर्वीच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे दिला असल्याचे सांगून आगामी वार्षिक नियोजनात कामांना अंतर्भूत करण्याची विनंती गडकरी यांना केली. त्यावर गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून अंमलबजावणीसाठी सकारात्मकता दाखविली आहे. मावळात झपाट्याने होणारे औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाचा साजेशा रस्ते विकासाला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे शेळके यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तळेगाव-चाकण चौपदरीकरणास हिरवा कंदील 
व्यवहार्यतेअभावी स्थगित असलेल्या 300 कोटींच्या प्रस्तावात फेरबदल करून याच प्रस्तवांतर्गत अस्तित्वातील रस्त्याचे दुभाजकासह अठरा मीटर सिमेंट रस्त्याच्या कामाला केंद्रीय मंत्री गडकरी यांनी हिरवा कंदील दर्शविला आहे. यासंदर्भात गेल्याच आठवड्यात आमदार शेळके यांनी तळेगावात सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून कुठलेही भूसंपादन न करता अस्तित्वातील रस्त्यावरील अतिक्रमणे काढून विस्तारीकरण करण्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून शहानिशा केली होती.याबाबत दिलेल्या निवेदनावर गडकरी यांनी शेरा मारत त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Sunil Shelke meet Nitin Gadkari for Road Transport and Highways regarding the development work of National Highway in Maval