
Motivational Story : वडिलांचे छत्र हरवले,मात्र जिद्द व कष्टाने तो २२ व्या वर्षी बनला तलाठी
जुनी सांगवी : वडिलांचे छत्र हरपले अशातही उमेद न खचता आई वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी जुनी सांगवी येथील अनिकेत दिक्षित याने वयाच्या बाविसाव्या वर्षी तलाठी बनून विद्यार्थी व तरूण पिढी समोर आदर्श निर्माण केला आहे.
मनात जिद्द आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर अशक्यही शक्य होते.त्याने मिळवलेल्या यशाबद्दल अनिकेतचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडून जुनी सांगवीतील मधूबन सोसायटीमधील अनिकेत अरुण दीक्षित यांची तलाठी पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते अनिकेत दीक्षित यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी आई संगीता दीक्षित, बहीण गिरीजा दीक्षित मामा जगदीश महामुनी उपस्थित होते. अनिकेत याने भुगोल विषयाची पदवी मॉर्डन महाविद्यालयातून घेतली.पोस्ट ग्रॅज्युएशन एम ए एमएस भुगोल विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पुर्ण केले.