Pimpri chinchwad : थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

electricity meter

Pimpri chinchwad : थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

पिंपरी : शहरातील लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक २ लाख १९ हजार २६३ वीजग्राहकांकडे बिलांची ७८ कोटी ४३ लाखांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन व विनंती करूनही भरणा होत नसल्याने वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक घडी विस्कटली आहे. परिणामी, महावितरणकडून नाईलाजाने १२ हजार ६० थकबाकीदारांचा पुरवठा खंडित केला आहे.

शहर व परिसरासाठी महावितरणचे पिंपरी व भोसरी असे दोन विभाग आहेत. या दोन्ही विभाग कार्यालयांतर्गत घरगुती १ लाख ८५ हजार ग्राहकांकडे ४७ कोटी ५२ लाख, वाणिज्यिक २७ हजार २५७ ग्राहकांकडे १९ कोटी ४३ लाख आणि औद्योगिक ६ हजार ६९३ ग्राहकांकडे ११ कोटी ४८ लाख रुपयांची थकबाकी आहे. अन्य कोणताही पर्याय नसल्याने थकबाकीदारांचा पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु केली आहे. थकबाकीचा भरणा न केल्यामुळे गेल्या महिन्याभरात १२ हजार ६० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामध्ये २ हजार २२७ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित केला आहे.

या मोहिमेत थकबाकीमुळे पुरवठा खंडित केल्यानंतर संबंधीत जोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरु आहे. तसेच सायंकाळनंतरही विशेष तपासणी करण्यात येत आहे. या दोहोंमध्ये शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर आढळल्यास शेजारी व वीज वापरणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.


‘‘घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.’’

-निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण

loading image
go to top