पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे कोरोनामुळे निधन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 July 2020

दत्ता साने यांच्यासह राष्ट्रवादीचेच माजी नगरसेवक एकनाथ थोरात यांचेदेखील मागील आठवड्यात कोरोनामुळे निधन झाले. 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक जावेद शेख यांचे शुक्रवारी (ता. 31) कोरोनामुळे निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. राष्ट्रवादीचेच विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांच्या निधनाची घटना ताजी असतानाच त्यांच्या पाठोपाठ जावेद शेख यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेख हे 2007 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीकडून बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर 2012 व 2017 च्या निवडणुकीतही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळविला. शेख यांना पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर आकुर्डीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने बुधवारी त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 

Image may contain: 1 person, beard and closeup
जावेद शेख

काही दिवसांपासून महापालिका अधिकारी, पदाधिकारी, डॉक्‍टर यांच्यासह लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होऊ लागली आहे. यापुर्वी दत्ता साने यांच्यासह राष्ट्रवादीचेच माजी नगरसेवक एकनाथ थोरात यांचेदेखील मागील आठवड्यात कोरोनामुळे निधन झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp corporator javed shaikh died due to corona