मावळात एकूण रुग्णांपैकी ७४ टक्के रुग्ण बरे, मात्र ही चिंतेची बाब

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 August 2020

मावळ तालुक्यात गुरुवारी (ता. २०) २७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर कोरोनाबाधित दोघांचा मृत्यू झाला.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात गुरुवारी (ता. २०) २७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर कोरोनाबाधित दोघांचा मृत्यू झाला. चांदखेड येथील ७० वर्षीय व बेबडओहळ येथील १०२ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या एक हजार ५५१; तर मृतांची संख्या ५८ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत एक हजार १५० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यात एकीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असले, तरी मृत्यूचे प्रमाण मात्र स्थिर आहे. आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी ७४ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर मृत्यूचे प्रमाण शेकडा ३.७ एवढे आहे व तीच चिंतेची बाब आहे.

पिंपरी-चिंचवडसाठी आनंदाची बातमी; स्वच्छ भारत अभियानात शहराने घेतली उभारी

गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या २७ जणांमध्ये लोणावळा येथील सर्वाधिक नऊ, तळेगाव येथील पाच, सोमाटणे येथील तीन, वडगाव, वराळे व शिरगाव येथील प्रत्येकी दोन; तर कामशेत, बऊर, भोयरे व वडिवळे येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या एक हजार ५५१ झाली असून त्यात शहरी भागातील ७९५ व ग्रामीण भागातील ७५६ जणांचा समावेश आहे. तळेगाव येथे सर्वाधिक ५०९, लोणावळा येथे १६९; तर वडगाव येथील रुग्ण संख्या ११७ झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एक हजार १५० जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णवाहिकेचे सायरन का वाजतायेत, काय आहे वास्तव? घ्या जाणून

गुरुवारी ४३ जणांना घरी सोडण्यात आले. तालुक्यात सध्या ३४३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २२४ जण लक्षणे असलेले व ११९ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २२४ जणांपैकी १४२ जणांमध्ये सौम्य, तर ६२ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. २० जण गंभीर आहेत. सध्या ३४३ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 27 corona positives in maval taluka on thursday 20 august 2020