Pimpri Chinchwad : 'दफनभूमी'मध्ये अंत्यविधी करण्यासाठी जागाच शिल्लक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'दफनभूमी'मध्ये अंत्यविधी करण्यासाठी जागाच शिल्लक

'दफनभूमी'मध्ये अंत्यविधी करण्यासाठी जागाच शिल्लक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मोरवाडी येथील शिवकैलास लिंगायत दफनभूमीमध्ये अंत्यविधीसाठी जागाच शिल्लक नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. यावर पर्याय म्हणून पदपथ फोडून त्या जागेत दफनविधी करण्यात येत असल्याचा गंभीर व संतापजनक प्रकार समोर आला आहे.

या दफनभूमीत मोहननगर, काळभोरनगर, रामनगर, महात्मा फुलेनगर, विद्यानगर, दत्तनगर, आनंदनगर, साईबाबानगर, इंदिरानगर, मोरवाडी, लालटोपीनगर, अण्णासाहेब नगर, शाहुनगर, संभाजीनगर आदी परिसरातील नागरिक अंत्यविधीसाठी येतात. मात्र, जागा माळरानाची असल्यामुळे दफन करण्यासाठी खड्डा खोदाईसाठी खूप परिश्रम पडतात. त्यामुळे २००७ ते २०१२ या कालावधीत माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी येथे चार फुटापर्यंत काळी पोयटा माती भरून घेतली. तसेच काळेवाडीकडून आयुक्त बंगल्याकडे जाणाऱ्या बीआरटीएस मार्गात याच दफनभूमीची काही जागा जाणार होती. जेवढी जाईल तेवढीच जागा लगतच्या ऑटोक्लस्टरच्या मोकळ्या जागेत मिळावी, अशी मागणी करत पर्यायी जागा मिळेपर्यंत रस्ता होऊ देणार नाही, अशीही ठाम भूमिका घेतल्याने ऑटोक्लस्टरच्या जागेत शिवकैलास लिंगायत दफनभूमी क्रमांक दोन तयार झाली.

दफनभूमी क्रमांक एक येथील अंत्यविधीसाठी जागा संपल्यामुळे दोन क्रमांकाच्या दफनभूमीत अंत्यविधी करण्यास सुरवात झाली. सद्यःस्थितीत जागा शिल्लक नाही. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पदपथ फोडून त्या जागेत अंत्यविधी सुरु आहेत. यामुळे व्यक्तीची मरणोत्तर हेळसांड, विटंबना होत असल्याची तक्रार भापकर यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. दफनभूमी क्रमांक एकमध्ये अंत्यविधी झालेल्या जागेतील माती काढून चार फूट नवीन पोयटा माती भरावी. अन्यथा त्या मातीवरच चार फूट नव्याने माती भरावी, म्हणजे समस्येचे निराकरण होईल, असा उपायही त्यांनी सुचविला आहे.

loading image
go to top