महापालिका आयुक्तांचा शहरवासीयांना सुखद धक्का वाचा सविस्तर...

महापालिका आयुक्तांचा शहरवासीयांना सुखद धक्का  वाचा सविस्तर...

पिंपरी-  कोरोना व लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर शहराचे अर्थकारण बिघडले आहे. महापालिकेच्या तिजोरीवरही परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी निश्‍चित केलेले उत्पन्नाचे उद्दिष्ट पन्नास टक्‍केसुद्धा पूर्ण झालेले नाही. तरीसुद्धा महापालिका आयुक्तांनी शहरवासीयांना सुखद धक्का दिला आहे. आगामी आर्थिक वर्षासाठी कोणतीही करवाढ सुचवलेली नाही. गेल्यावर्षीचेच कराचे दर कायम ठेवले असून, त्याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी (ता. १९) होणाऱ्या स्थायी समिती सभेसमोर ठेवला आहे. 

महापालिका अधिनियमानुसार मिळकतींवर कर व करेतर बाबींचे दर शहरात लागू आहेत. तसेच, शिक्षण, रोजगार हमी व अन्य करांची वसुली सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे केली जाते. २० फेब्रुवारीपूर्वी करांचे दर ठरविणे आवश्‍यक असल्याने पुढील आर्थिक वर्षातील दर प्रस्तावित केले आहेत, असे आयुक्तांनी प्रस्तावात म्हटले आहे. वास्तविकतः मिळकतकरांची आकारणी ही मिळकतीच्या कर योग्यमूल्यावर आधारित असते. मिळकतींच्या निवासी व निवासेत्तर प्रकारानुसार करांचे दर ठरविले जातात. 

सामान्य करात सवलत
थकबाकीसह एकरकमी मिळकतकराची रक्कम ऑनलाइन भरल्यास नागरिकांना सवलत दिली जाणार आहे. एप्रिल ते जूनअखेरपर्यंत भरल्यास सर्वसाधारण करात पाच टक्के, जुलै ते मार्च २०२२ अखेरपर्यंत भरल्यास सर्वसाधारण करात दोन टक्के सवलत दिली जाणार आहे. 

असे आहेत आयुक्तांचे प्रस्ताव
    सामान्य करामध्ये मिळकतीच्या एक ते बारा हजार रुपयांपर्यंतच्या करयोग्य मूल्यावर १३ टक्के निवासी व १४ टक्के निवासेतर कराच्या दराचा प्रस्ताव आहे. हेच प्रमाण १२ हजार एक ते ३० हजार रुपये करयोग्यमूल्यावर अनुक्रम १६ व १७ टक्के आणि ३० हजार एकपासून पुढील करयोग्यमूल्यावर प्रत्येकी (निवासी व निवासेत्तर) २४ टक्के दर सुचवला आहे.

    साफसफाई कराचे दर करयोग्य मूल्यावर निवासीसाठी पाच व निवासेतरसाठी सहा टक्के आहे. अग्निशामक कराचा दर प्रत्येकी दोन टक्के व वृक्षकर प्रत्येकी एक टक्का आहे. महापालिका शिक्षणकर अनुक्रमे चार व पाच टक्के आहे. 

 पाणीपुरवठा लाभ कराचा दर करयोग्य मूल्यावर निवासीसाठी चार व निवासेत्तरसाठी पाच टक्के आहे. सांडपाणी सुविधांसाठी दोन्ही प्रकारच्या मिळकतींसाठी प्रत्येकी पाच टक्के आहे. रस्ता कराचा दर मात्र अनुक्रमे दोन व तीन टक्के आहे.  

     निवासी मिळकतींसाठी विशेष साफसफाई कर प्रस्तावित केलेला नाही. मात्र, माफल्स, लॉजिंग-बोर्डिंग, मंगळ कार्यालये, सभागृह, रुग्णालये, हॉटेल, कॅंटीन, रेस्टॉरंट यांच्यासाठी दोन टक्के कर प्रस्तावित आहे. 

     नाट्य व चित्रपटगृहांसाठी आसन क्षमतेनुसार करआकारणी केली जाणार आहे. मात्र, मराठी चित्रपटांना यातून सूट देण्यात आली आहे. नाटक, सर्कस, तमाशा, सांगीतिक कार्यक्रमास प्रतिदिन शंभर रुपये, खेळांसाठी प्रतिप्रयोगास पन्नास रुपये, साधारण थिएटरला प्रतिस्क्रिन अडीचशे व एसी थिएटरला प्रतिस्क्रिन साडेतीनशे रुपये दर प्रस्तावित आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com