esakal | कोरोनामुळे भुशी डॅम 'क्वारंटाईन'; लोणावळ्यात पर्यटनाला फटका
sakal

बोलून बातमी शोधा

भुशी धरण ः जमावबंदीमुळे पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे केंद्र असलेले भुशी धरण पर्यटकांअभावी ओस पडले आहे.

कोरोनामुळे भुशी डॅम 'क्वारंटाईन'; लोणावळ्यात पर्यटनाला फटका

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

लोणावळा : ऐन हंगामात लोणावळा, खंडाळ्यासह संपूर्ण मावळ तालुक्यात जिल्हा प्रशासनाने जमावबंदी लागू केल्याने पर्यटक संख्या रोडावली आहे. सध्या पर्यटन कसेबसे पूर्वपदावर येत असताना, कोरोना रुग्णसंख्येत घट होत नाही. त्यात पर्यटनस्थळांवर तुडुंब गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळांवर १४४ कलम (जमावबंदी) लागू केले आहे. त्यामुळे पर्यटननगरी असा लौकिक असलेल्या लोणावळा, खंडाळा व कार्ला परिसरातील सर्व पर्यटनस्थळे ओस पडली आहेत.

परिणामी पर्यटननगरी आर्थिक संकटात सापडली आहेत. लोणावळा, खंडाळ्यासह मावळातील पर्यटनस्थळे नेहमी गजबजलेली असतात. त्यातही सध्या पावसाळी पर्यटन, वर्षाविहाराचा नवीन ट्रेंड पहावयास मिळत आहे.

हेही वाचा: सी-डॅकतर्फे ऑनलाइन PG, Diploma अभ्यासक्रम; २९ जुलै अंतिम मुदत

पावसाळ्यात पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात असते. मात्र, सध्या भुशी धरण, लायन्स पॉइंटसह मावळातील सर्व पर्यटनस्थळे आणि हिलस्टेशन्स लॉकडाउन झाली. पोलिस पर्यटकांना माघारी पाठवत आहेत. दरम्यान, कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाही. त्यामुळे पर्यटकांनी काही दिवस घराबाहेर पडणे टाळावे. पर्यटनस्थळे बंद असून वेळप्रसंगी पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

सीझन वाया जाणार...

पावसाळ्यातील तीन महिन्यांमध्ये लोणावळा परिसरातील अनेक नागरिकांना उदरनिर्वाहाचे साधन मिळते. याच तीन महिन्यांच्या हंगामी व्यवसायावर अनेकांचे संसार उभे राहतात. मात्र, सध्या सर्व पर्यटनस्थळे ओस पडल्याने अनेकांपुढे घरगाडा चालवायचा कसा? असा प्रश्न आहे. पर्यटकच नसल्याने रिक्षा आणि टॅक्सी सेवेवरही परिणाम झाला आहे. भुशी धरण भरले आहे. मात्र, लोकच नसल्याने दुकान लावायचे कोणासाठी हा प्रश्न आहे. यंदाचा हंगाम वाया जाणार असून, मोठा आर्थिक बोजा सहन कसा करावा लागेल, असे भुशी धरण येथे तात्पुरते हॉटेल व्यवसाय करणारे व्यावसायिक व धरणावरील जीवरक्षक साहेबराव चव्हाण यांनी सांगितले. पावसाळी पर्यटनामुळे जरा कुठे सावरत होतो, पुन्हा निर्बंध लावल्यामुळे व्यवसायास चाप बसणार आहे, यामुळे पर्यटन व्यवसायावर दूरगामी परिणाम होतील, असे व्यावसायिक सुभाष राशिंगकर यांनी सांगितले.

loading image