Video : ...हे आहेत खरे 'कोरोना वॉरिअर्स'

Video : ...हे आहेत खरे 'कोरोना वॉरिअर्स'

पिंपरी : काहींच्या घरांत वयोवृद्ध सासू- सासरे आहेत, तर कोणाच्या घरी तान्हुलं बाळ रांगतयं, बऱ्याच जणींची महिना झाला, तरी मुलाची भेट नाही; त्याच्या आठवणीने डोळे भरून येतात... तर काहींनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे. तरी, गेले दीड महिने घरापासून दूर राहून कोरोगाग्रस्तांना बरे करण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. या आहेत महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील परिचारिका. घर सांभाळून रुग्णसेवा करण्याची दुहेरी जबाबदारी पार पडणाऱ्या या  परिचारिका ठरताहेत 'कोरोना वॉरिअर्स'.

संत तुकारामनगरमधील वायसीएम रुग्णालयात कायमस्वरूपी आणि मानधनावरील सुमारे 200 ते 250 परिचारिका कार्यरत आहेत. शहरात मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केल्यावर डॉक्‍टर्स, नर्सेसनी रुग्णांच्या सेवेत स्वत:ला झोकून दिले. रुग्णांची सेवा करता यावी, यासाठी अनेक परिचारिकांनी घर सोडले आहे, काहींनी लहान मुलांना गावी पाठवून दिले आहे. दुसरीकडे वृद्ध व्यक्तीच्या शरीरात रोग प्रतिकार शक्ती कमी असते, त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती जास्त असते, असे डॉक्‍टरांकडून सांगण्यात येतंय, तरीही वायसीएममध्ये दहा हून अधिक ज्येष्ठ परिचारिका धीरोदत्तपणे रुग्णसेवा करत असल्याचे प्रातिनिधिक माहिती वायसीएमच्या मेट्रन मोनिका चव्हाण यांनी दिली. 

त्या म्हणाल्या, "मेट्रन या पदावर कार्यरत असताना परिचारिका व कर्मचारी यांच्याकडून संबंधित कामकाज व रुग्णसेवा सुरळीतपणे करून घेणे, ते करून घेताना प्रत्येक महत्त्वाच्या विभागात सक्षम स्टाफ उपलब्ध करून देणे तारेवरची कसरत असते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चव्हाण सांगतात, "पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आल्यावर लक्षात आले की, आपली लढाई आता सुरू झाली. त्याच दिवशी माझ्या सगळ्या नर्स, कर्मचाऱ्यांना सांगितले की कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा. कर्तव्य महत्त्वाचे आहे. आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे वायसीएम प्रशासनाला अद्ययावत आयसीयू व आयसोलेशन वॉर्ड तयार केला. सर्व व्यवस्था केली. तेव्हापासून आजपर्यंत कोरोनाला झुंज देण्याचे काम आम्ही अहोरात्र करत आहोत. वायसीएमला कोवीड रुग्णालय घोषित केल्यानंतर शासनाच्या मार्गदर्शन तत्त्वाप्रमाणे फिवर ओपीडी, ट्राएज एरिया, आयसोलेशन आयसीयू, सस्पेकटेड वॉर्ड, पॉझिटिव्ह वॉर्ड, निगेटिव्ह वॉर्ड, पेडिएट्रिक वॉर्ड, ऑपरेशन थिएटर, लेबर रूम सर्व सोयी अद्ययावत ठेवण्यात आल्या आहेत."

वयापेक्षा 'ड्यूटी' महत्त्वाची

57 वर्षीय मेट्रन मोनिका चव्हाण यांच्यासह काही नर्सेस व कर्मचाऱ्यांनी वयाची पन्नाशी ओलांडलेली आहे, तरी कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करत आहेत. काही जण रक्तदाब, मधुमेह अशा प्रकारच्या आजाराने त्रस्त आहेत. काही जणींचे वयोवृद्ध आई वडील, सासू सासरे आहेत, त्यांनाही वरील आजार आहेत. तसेच काहींच्या घरी लहान बाळ आहे. अशा परिस्थितीत परिचारिका व कर्मचारी स्वत:ची काळजी घेत अहोरात्र सेवा करत आहेत. प्रशासनाकडून त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. ज्या नर्स दुरून येतात, त्यांच्यासाठी राहण्याची सोय केली आहे. आपल्या परिवारापासून दूर राहून धोका पत्करून वैद्यकीय सेवा करत असल्याने नागरिकांनी घरात राहूनच मदत करावी, अशी अपेक्षा  चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com