esakal | जुनी सांगवीकरांनी लाडक्या बाप्पाला दिला असा निरोप 
sakal

बोलून बातमी शोधा

जुनी सांगवीकरांनी लाडक्या बाप्पाला दिला असा निरोप 

प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करत येथील नागरिकांनी लाडक्‍या गणरायाची मूर्तीदान केली.

जुनी सांगवीकरांनी लाडक्या बाप्पाला दिला असा निरोप 

sakal_logo
By
रमेश मोरे

जुनी सांगवी : प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करत येथील नागरिकांनी लाडक्‍या गणरायाची मूर्तीदान केली. महापालिका, पोलिस, स्थानिक मंडळे व संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती करून फिरता हौद व विसर्जन गाड्यांची व्यवस्था केली होती. एरव्ही जुनी सांगवीच्या भव्य मिरवणुकांना पंचक्रोशीत नावलौकिक आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे त्या आनंदावर विरजण पडले. अशा वातावरणातही घरगुती व मंडळांनी लाडक्‍या गणरायाची सात दिवस भक्तिभावाने सेवा करत बाप्पाला निरोप दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुनी सांगवी परिसरात मूर्तीदान करण्यासाठी महापालिकेकडून चार फिरत्या हौदासह गाड्यांची व्यवस्था केली होती. येथील सीझन सोशल वेल्फेअर ट्रस्ट व प्रशांत शितोळे मित्रमंडळातर्फे 'जबाबदारी आम्ही घेतो, खबरदारी तुम्ही घ्या' अशी ध्वनिक्षेपकावरून जनजागृती करत पाच फिरत्या विघ्नहर्ता रथांच्या माध्यमातून मूर्ती संकलनाची व्यवस्था केली होती. तसेच, महापालिकेच्या चार गाड्यांमार्फत गल्ल्यांमधून मूर्ती संकलन करण्यात आले. यंदा शाडू मातीच्या मूर्तींचे विसर्जन घाटावर न करता घरीच विसर्जन करावे. तसेच ज्यांच्याकडे प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आहे, त्यांनी स्वयंसेवी संस्थांकडे मूर्तीदान कराव्या, अशा सूचना पालिकेकडून केल्या होत्या. दरम्यान, पहिल्या दिवसापासूनच गर्दी टाळण्यासाठी मिरवणुका व विसर्जन घाटावरील विसर्जनाला प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले होते. सांगवी पोलिसांकडून पहिल्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक चौक व विसर्जन घाटावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मंडळांकडून निरोप 

येथील राहिमाई प्रतिष्ठान, संयुक्त शिव प्रतिष्ठान, जे. डी. ग्रुप सांगवी गावठाण, मधुबन मित्र मंडळ, आनंदनगर मित्र मंडळ, रणझुंजार मित्र मंडळ, समर्थ मित्र मंडळ, बालाजी प्रतिष्ठान, शिवशक्ती व्यायाम मंडळ, सुवर्णयुग मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, मुळानगर तरुण मंडळ, नवयुग तरुण मित्रमंडळ आदी मंडळांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून बाप्पाला निरोप दिला. 

राजकीय पक्षांकडूनही पुढाकार 

पालिकेतर्फे येथील कर संकलन इमारत (गजानन महाराज मंदिरासमोर), बॅडमिंटन हॉल पीडब्ल्यूडी ग्राउंड, रामकृष्ण मंगल कार्यालय, मनपा शाळा पिंपळे गुरव, मल्हार गार्डन नवी सांगवी; तर चौकाचौकात मूर्ती संकलनासाठी फिरत्या गाडीची व्यवस्था केली होती. याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या वतीनेही फिरत्या रथाची व्यवस्था करून मूर्ती संकलन केले. 
 

loading image