
Pune Traffic : भूमकर चौकातील एकेरी वाहतूक बेकायदेशीर; व्यापारी व रहीवाशांचा आरोप
- बेलाजी पात्रे
वाकड : आयटी पार्क हिंजवडीकडे जाणाऱ्या भूमकर चौक, विनोदे चौक व लक्ष्मी चौकातील मार्गावर करण्यात आलेली एकेरी वाहतूक बेकायदेशीर असून ती जनतेला अमान्य असल्याचा आरोप येथील रहिवाशी व व्यापाऱ्यांनी पोलीस, राजकीय पुढारी व मंत्र्यांकडे पत्राद्वारे केला आहे.
व्यापारी व रहिवाशांनी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह राज्याचे गृह मंत्री, सर्व स्थानिक आमदार, खासदार स्थानिक नगरसेवक व सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे कैफियत मांडली आहे तसेच आठ दिवसाच्या आतकाय तो निर्णय द्यावा अन्यथा तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल त्यास तुम्ही जबाबदार असाल असा इशाराही देण्यात आला आहे.
आम्हा जनतेला वेठीस धरून आपण काय साध्य करू इच्छिता हे कोणालाही ज्ञात होत नाहीये. एकेरी वाहतूक करण्याचा निर्णय बेकायदेशीर आहे. तो आम्हाला मान्य नाही. माणुसकीचा विचार करून कृपया आम्हा जनतेवर निर्णय लादू नये व ताबडतोब जैसे थे परिस्थिती ठेवावी ही विनंती असे पत्रात म्हटलें आहे.
पत्रातील काही मुद्दे व मागण्या
भूमकर व विनोदे चौकात केलेली एकेरी वाहतूक बेकायदेशीर असून ती आम्हाला अमान्य
एकेरी वाहतूकीमुळे व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे
रहिवाश्यांचीही मोठी गैरसोय सुरू
वाहने जोरात असल्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत
धरून रास्ता ओलांडावा लागतोय.काही अपघातही झालेत
ट्रैफिक जामची परस्थिती पूर्वी सारखीच जैसे थे आहे.
किरकोळ कामासाठी दोन किमीचा प्रवास तोही वाहतूक कोंडीतून.