लालपरीचे दिवाळी वेळापत्रक कधी?

सुवर्णा नवले
Sunday, 1 November 2020

गाळात रुतलेल्या लालपरीला वल्लभनगर आगाराकडून उत्पन्नवाढीची अपेक्षा कशी करायची? असा प्रश्‍न विभागीय अधिकाऱ्यांना पडला आहे.

पिंपरी : कोरोनामुळे आर्थिक खड्ड्यात गेलेल्या एसटी महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड वल्लभनगर आगाराने अद्याप दिवाळीचे वेळापत्रकच तयार केलेले नाही. त्यामुळे यंदाही दिवाळीसाठी आपापल्या गावी जाऊ इच्छिणाऱ्या बहुसंख्य प्रवाशांना पुण्यातील स्वारगेटचा आधार घ्यावा लागणार आहे. गाळात रुतलेल्या लालपरीला वल्लभनगर आगाराकडून उत्पन्नवाढीची अपेक्षा कशी करायची? असा प्रश्‍न विभागीय अधिकाऱ्यांना पडला आहे.
 

दिवाळीत शंभर टक्‍के क्षमतेने एसटी धावणार आहे. एक नोव्हेंबरपासून 85 टक्के व सध्या 70 टक्के बस मार्गावर धावत आहेत. प्रवाशांसाठी आठ ते नऊ जादा बस देण्यात येणार आहेत. साध्या, आराम व निमआराम मिळून एकूण 37 बस सध्या मार्गावर आहेत. शिवशाहीच्या सात बस आहेत. दिवाळीच्या कालावधीत हैदराबाद, उमरगा, नाशिक, दापोली, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी शिवशाही धावणार आहेत. प्रवाशांच्या मागणीचा म्हणजेच ग्रुप बुकिंगचा विचार करता जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. सध्या लातूर, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, दादर या मार्गावर जादा फेऱ्यांचे नियोजन असल्याचे एसटी प्रशासन सांगत आहे. मात्र, नेमक्‍या या बसेस कोणत्या वेळी, कोठून किती वाजता जाणार याचे नियोजन आगाराकडे शून्य आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अधिकारी रजेवर
एसटीचे काही अधिकारी बऱ्याच दिवसांपासून रजेवर आहेत. काही जणांच्या मेडिकल, उरलेल्या रजा, जोडून सुट्ट्या व दांड्या मारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आधीच मनुष्यबळ कमी असताना दिवाळीत प्रवाशांना योग्य सुविधा कोण पुरविणार? हा मोठा प्रश्‍न आहे. कोरोनामुळे आधीच प्रवाशांची संख्या घटली आहे. वास्तविक दिवाळीचा काळ हा उत्पन्नवाढीसाठी पोषक आहे. नियोजन शून्य कारभाराचा फटका महामंडळाला आर्थिक बसणार आहे. तसेच प्रवाशांना मनस्तापही होणार आहे.

दिवाळीतील भाडे वाढ रद्द
वल्लभनगर आगारात दरवर्षी दिवाळीत दहा ते वीस टक्के भाडेवाढ फेरीनिहाय होते. एसटीला महसूल चांगला मिळतो. मात्र, यावर्षी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. आधीच एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. बोनसचा पत्ता नाही. आगारात असलेल्या मनुष्यबळावर व उपलब्ध गाड्यांच्या संख्येवरच एसटी रुळावर आणण्याचे मोठे आवाहन आगारा समोर आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी दिलासादायक बातमी; कोरोनामुळे आज शहरातील एकही मृत्यू नाही

ऑनलाइन आरक्षण सुरू आहे. चालक-वाहकांची संख्या कमी असल्याने दिवाळीत सर्वांना डबल ड्यूटी देण्याचे नियोजन आहे. अद्याप कोरोनामुळे वेळापत्रकाचा अंदाज येत नाही. त्यामुळे प्रवाशांचा कल पाहता नियोजन केले जाणार आहे.
- स्वाती बांद्रे, आगार व्यवस्थापक, वल्लभनगर

"एमएसआरटीसी' ऍपवर "बस नॉट फाउंड'
एमएसआरटीसी (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ) ऍपवर पिंपरी-चिंचवड आगाराच्या वातानुकूलित, साधी, निमआराम, परिवर्तन, शिवशाही, मिनी, शटल, शिवनेरी पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, या कोणत्याही कॉलमवर क्‍लिक केल्यास दैनंदिन मार्गावरील बसचे बुकिंगही 'नॉट फाउंड' दाखवत आहे. त्यामुळे, 'ऑनलाइन बुकिंग करा' असे आगार म्हणत असले तरीही त्याकडेही प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसत आहे. परिणामी प्रवाशांना नक्कीच त्रास सहन करावा लागणार असल्याचे दिसून आले आहे.

Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात आज 121 जणांना डिस्चार्ज 

हेल्पलाइनवरही मिळेना प्रतिसाद
शनिवारी, दुपारी 4.38 ला वल्लभनगर आगाराच्या 020- 27420300 चौकशी क्रमांकावर "सकाळ' प्रतिनिधीने दोन कॉल केले. मात्र, व्यवस्थित माहिती मिळाली नाही. पहिल्या कॉलला फोन उचलला नाही. दुसऱ्या कॉलला महिलेने फोन बाजूला ठेवला. त्यानंतर बऱ्याच बस सुरू नसल्याचे सांगितले. आगारात वेळापत्रक पहा. शिवशाही सुरू असल्याचे सांगितले. त्याचबरोबर ऑनलाइन वेळापत्रकाची माहिती माझ्याकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passenger are unhappy with unplanned management of ST depot of Vallabhnagar