भाजपचे ‘मिशन महापालिका २०२२’

भाजपचे ‘मिशन महापालिका २०२२’

पिंपरी - शहरातील नागरिकांवर असलेले कोरोनाचे सावट व कोलमडलेली आर्थिक गणिते यांचा विचार महापालिका अंदाजपत्रकात केला असल्याचे दिसते. मात्र, त्यावर नजर मारल्यानंतर सत्ताधारी भाजपचे ‘मिशन महापालिका २०२२’ असेही चित्र दिसते. कारण, महापालिकेचे उत्पन्न घटलेले असतानाही कोणतीही करवाढ नाही. डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत दररोज पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट, सर्व रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती व डांबरीकरण, विविध कामांना प्राधान्य, अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यावर भर यातून भाजपचा निवडणूक अजेंडा दिसून येतो. 

महापालिका स्थायी समितीकडे आयुक्त म्हणून राजेश पाटील यांनी अंदाजपत्रक सादर केले असले तरी त्याची अंतिम रचना तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली आहे. कारण, त्यांची बदली झाल्याने तीन दिवसांपूर्वीच अर्थात सोमवारी (ता. १५) पाटील यांनी पदभार स्वीकारला. अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सप्टेंबर महिन्यापासून सुरू होते. त्याच सामान्य नागरिकांचा सहभागही असतो. क्षेत्रिय कार्यालय स्थरावर दहा लाख रुपये खर्चाची कामे नागरिक सुचवू शकतात. सध्या महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सलग पंधरा वर्षे सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पराभव करून १२८ पैकी ७७ नगरसेवक निवडून आणून भाजपने महापालिका ताब्यात घेतली. या सत्तांतराला रविवारी (ता. २१) चार वर्ष पूर्ण होत आहेत. आता निवडणुकीला अवघे एक वर्ष शिल्लक आहे. भाजपला सत्ता राखायची आहे. शिवाय, राज्यस्तरावर एकत्र आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना यांच्याशी सामना करायचा आहे. त्यासाठी व्यूव्हरचना आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे. सध्या सुरू असलेला दिवसाआड पाणीपुरवठा दररोज करणे, त्यासाठी आंद्रा व भामा-आसखेड प्रकल्प पूर्ण करणे. सगळीकडे खोदून ठेवलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करून त्यांचे डांबरीकरण करणे आदी कामांना प्राधान्य देण्यासह विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठीही अंदाजपत्रकात तरतूद केली आहे.

दृष्टिक्षेपात प्रकल्प 
पिंपरी वाघेरे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याबरोबरच बोऱ्हाडेवाडी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा १४० फूट उंचीचा पुतळा उभारणे, आरक्षण ताब्यात घेऊन विकसित करणे, लोहगाव-चऱ्होली रस्त्यासाठी रखडलेले भूसंपादन करणे, पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण, वाहतूक व्यवस्था सुधारणे.

बीआरटी मार्गांची कामे मार्गी
शहरातील बीआरटी मार्गांसाठी अंदाजपत्रकात २१७.८७ कोटी व जेएनएनयूआरएम अंतर्गत २६० कोटी तरतूद केली आहे. यात निगडी भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलासाठी पाच कोटी तरतूद आहे. या पुलामुळे चौकातील वाहतूक सुरळीत होणार आहे. ग्रेडसेपरेटर व उड्डाणपुलामुळे भक्ती-शक्ती चौकातून नाशिक महामार्ग ते मुंबई महामार्ग ते द्रुतगती मार्ग वाहतूक सुरळीत व विनाथांबा होणार आहे.

अन्य कामे पुढीलप्रमाणे

  • भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक, किवळे रस्त्यासाठी १० कोटी तरतूद आहे. रेल्वेलाईन उड्डाणपुलापासून किवळे-मुकाई चौकापर्यंत रस्त्याचे काम डिसेंबर २०२२ अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. या मार्गावर निगडी भक्ती-शक्ती ते मुकाई चौक किवळे असा बीआरटी मार्ग चालू करण्याचे नियोजन आहे.
  • नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस रस्त्यावर साई चौक (जगताप डेअरी) रहाटणी येथे दोन समांतर समतल वितलग बांधण्यासाठी आठ कोटी तरतूद आहे. एक समतल विलगकाचे काम पूर्ण झाले असून वाहतुकीसाठी खुला आहे. दुसरा समतल वितलगाची लांबी ४३० मीटर आहे. त्याचे काम जुलै २०२१ अखेर करण्याचे नियोजन आहे.
  • नाशिक महामार्गावरील पांजरपोळ चौक ते आळंदी रस्त्यापर्यंतचा रस्ता विकसित करण्यासाठी ८४.७४ कोटी तरतूद आहे. या रस्त्यामुळे भोसरी येथील वाहतूक कोंडी कमी होणार असून पुणे-लोहगाव विमानतळाकडे जाण्यासाठी सोयीचा मार्ग होणार आहे. सद्यःस्थितीत ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
  • नाशिक फाटा ते वाकड रस्त्यावर ३० किलोमीटर लांबीचा एचसीएमटीआर रस्ता विकसित करण्याचे नियोजन आहे. यामुळे शहराचे वाहतूक विषयक नविन रूप साकारण्याचा प्रयत्न आहे. यासाठी आठ कोटी तरतूद आहे. 
  • पार्किंग पॉलिसी राबविण्यांतर्गत १३ मुख्य रस्त्यावर पे-पार्कची निविदा प्रसिद्ध करून ठेकेदाराची नेमणूक केली आहे. यातून उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होणार असून वाहतुकीस शिस्त लागणार आहे. या प्रकल्पांमुळे प्रवासाच्या वेळेत बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com