
महापालिकेच्या वतीने चिखली - स्पाईन रोड (सेक्टर 17 व 19) येथे घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील 126 लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत मंगळवारी काढण्यात आली.
पिंपरी - घरकुल सोडत असल्याने धाकधूक, टेन्शन नावांचा पुकारा होत होता आणि उत्कंठा वाढत होती. डिजीटल फलकावर पुढील नाव आपले झळकावे यासाठी प्रार्थना करत होतो. एकेक्षणी महापौरांनी माझे नाव जाहीर केले. माझा कानावर विश्वासच बसतच नव्हता. डोळ्यांच्या कडा पाणावल्या. हक्काच्या घराचे स्वप्न आज पूर्ण झाले, अशी भावना पिंपरीतील खराळवाडीत राहणारे रामदास बोत्रे यांनी व्यक्त केली. ते दिव्यांग आहेत.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महापालिकेच्या वतीने चिखली - स्पाईन रोड (सेक्टर 17 व 19) येथे घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील 126 लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत मंगळवारी काढण्यात आली. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात झालेल्या सोडतीस महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शहर सुधारणा समिती सभापती सोनाली गव्हाणे उपस्थित होते. नियोजित घरकुल सहकारी गृहरचनेचे प्रतिनिधी अर्जुन शिंदे, बाबाजी वाळूंज, अशोक कासुळे यांच्याकडे लाभार्थ्यांची यादी सुपूर्त करण्यात आली.
अर्जदारांची गर्दी
सकाळी दहापासून घरकुल अर्जदार आपापल्या नातेवाईकांसोबत ऑटो क्लस्टरच्या आवारात बसले होते. ज्यांनी 50 हजार रुपयांचा हप्ता भरलेला आहे. अशांनाच आतमध्ये सोडण्यात येत होते. बाकीचे आपापल्या विचारात आणि तणावामध्ये बसून होते. जाहीर सोडतीत नेमके कोणाचे नाव आले आहे, याची प्रत्येकजण एकमेकांना विचारपूस करत होते. सोडतीनंतरच्या यादीत प्रत्येकजण स्वत:चे नाव शोधत होते. ज्यांना लॉटरी लागली नाही, असे अनेकजण हताश चेहऱ्याने घरी परतले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
तीन इमारतीमध्ये 126 सदनिका
केंद्र सरकारच्या बीएसयुपी योजनेअंतर्गत चिखली येथे तीन इमारतीमध्ये 126 सदनिकांची योजना राबविली जात आहे. एकेक इमारतीमध्ये 42 लाभार्थ्यांचा समावेश केला असून योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांनी 2007 मध्ये अर्ज केलेला होता. प्रत्येक इमारतीमध्ये तळमजल्यावर दिव्यांग व अंध लाभार्थ्यांना राखीव कोटा ठेवलेला आहे.
लाभार्थी बोत्रे म्हणाले, ""माझी पत्नी, दोन मुले आणि आईसोबत मी माझ्या भावाच्या घरात राहत आहे. दिव्यांग असल्याने अनेक प्रश्न आहेत. 2007मध्ये अर्ज भरला होता. 2015मध्ये 50 हजार रुपये भरले. पाच वर्ष उलटले तरी घरकुल काही मिळेना. आज प्रत्यक्षात यादीत नाव पाहिल्यावर हक्काचे घर मिळाल्याचा आनंद काही निराळा आहे.''
पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
लाभार्थी अर्जुन शिंदे म्हणाले, ""घरकुलची प्रतीक्षा होती. आता 13 वर्षानंतर घरकुलची सोडत निघाली. आता ताबा कधी मिळेल, याची प्रतीक्षा आहेच. महापालिकेने लवकरातलवकर घराचा ताबा द्यावा.''