Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडचा सर्वांगिण विकास हाच माझा ध्यास - अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit pawar

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडचा सर्वांगिण विकास हाच माझा ध्यास - अजित पवार

वाकड : मी कुठेही असलो, पदावर नसलो तरी पिंपरी-चिंचवड शहराला कशी मदत करता येईल, कसं झुकतं माप देता येईल यासाठी नेहमी प्रयत्नशिल असतो. शहराचा सर्वांगिण विकास हाच माझा ध्यास असून नियोजनबद्ध विकासातून शहराचा चेहरा-मोहरा बदलल्याने इथे असंख्य सोसायट्या उदयास आल्या. मात्र हे सोसायटी रहिवाशी विविध समस्यांनी ग्रासले आहेत. त्यामुळे लवकरच महापालिका आयुक्तांशी बैठक घेऊन हे सर्व प्रश्न सोडविणार. हा माझा शब्द आहे असे आश्वासन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी थेरगाव येथे दिले.

माजी नगरसेविका माया बारणे व माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांच्या संकल्पनेतून आयोजित संवाद सोसायटी धारकांशी या उपक्रमात सोसायटी रहिवाशांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, अजित प्रतिष्ठानचे अभय मांढरे, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, योगेश बहल, नाना काटे, मयूर कलाटे, कैलास बारणे उपस्थित होते. दसऱ्याच्या सणादिवशी व सकाळी आठ वाजता परिसंवाद असतानाही पिंपरी-चिंचवड शहरासह पुण्यातील सोसायटी धारकांनी गाऱ्हाणे मांडण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

पवार पुढे म्हणाले, गेल्या ३० वर्षांपासून या शहराचे अन् माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. १९९१ ते २०१७ पर्यंत आम्ही पिंपरी-चिंचवडकरांच नेतृत्व केलं त्यांनीही आम्हाला खंबीर साथ दिल्याने सर्व जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेत शहराचा सर्वांगीण विकास साधला. महापालिकेच्या माध्यमातून सर्व मूलभूत सुविधा देऊनही २०१७ ला नागरिकांनी राष्ट्रवादीला नाकारले. यावेळी योगेश साळुंके अभिजित गरड, सुधीर देशमुख, दशरथ जाधव, विकास साने, तुषार रोडे, सचिन कुदळे, इरफान शेख, राजश्री चिंचवने, सुरेश देवराज, अभय पाषाणकर या काही प्रमुख सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी पवार यांच्यापुढे समस्या मांडल्या, तक्रारींचे निवेदन दिले. त्यानंतर संबंधित ज्या-त्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन तसेच पाठपुरावा करून सर्व समस्या सोडविल्या जातील. मात्र, सोसायटी राहिवाशांनी देखील मालकी वृत्ती सोडून अंतर्गत वाद टाळावेत असा सल्लाही त्यांनी दिला.

सोसायटी धारकांचा मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क राज्य शासनाच्या तिजोरीत तर प्रॉपर्टी व इतर टॅक्स महापालिकेच्या तिजोरीत जातो. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना सर्व सुविधा दिल्याच पाहिजेत. शहरातील ५० हजार बांधकाम प्रकल्पापैकी केवळ ५ ते ६ हजार बांधकाम व्यावसायिकांनी पूर्णत्वाचा दाखल घेतला असून ही चिंतेची बाब आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. १ कोटींवरून टप्प्या टप्प्याने वाढवत आमदार निधी मी पाच कोटींवर नेला आहे. यातून सर्व आमदारांना विकासकामांसाठी साडे सतराशे कोटी रुपये मिळतात त्यामुळे त्याच्या कार्यक्षेत्रातील सोसायटीच्या मूलभूत व पायाभूत सुविधांठी त्याला तो निधी खर्च करता येणार आहेत. संतोष बारणे यांनी आभार मानले.

प्रास्ताविकात माया बारणे म्हणाल्या पवार साहेबांच्या दुर्ददृष्टीमुळे आयटी हब व बालेवाडी क्रीडा संकुल आले. अजित दादांनी शहराचा सुनियोजित विकास साधला. शहरातील हजारो सोसायट्यांना नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने त्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागते यातुन वर्षाकाठी लाखो रुपयांचा भुर्दंड त्यांना सहन करावा लागतो त्यामुळे ज्या सोसायटीना कम्प्लिशन आहे त्यांना महापालिकेच्यावतीने प्रायोगिक तत्वावर टँकर पुरवावेत. २०१६ नंतरच्या ८० फ्लॅटपुढील सोसायट्यांनी घनकचरा प्रकल्प राबवावा अशा नोटिसा महापालिकेने बाजाविल्या आहेत मात्र प्रत्यक्षात सोसायटीत जागाच शिल्लक नाही तर घनकचरा प्रकल्पही अतिशय खर्चिक असल्याने ते शक्य नाही त्यामुळे आयुक्तांशी चर्चा करून यातून मार्ग काढण्याची विनंती त्यांनी पवारांना केली.

संवाद मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद पराकोटीला गेला आहे. आता मुंबईतील पोट निवडणुकीच्या निकालाकडे त्यानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष असेल. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार की गोठवणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्र अस्थिर होणार नाही. पण या राजकीय भांडणात महागाईने जनता होरपळत असून या राजकीय गदारोळात महागाई आणि बेरोजगारी हे महत्वाचे प्रश्न बाजूला पडले आहेत.