पिंपरी चिंचवडमध्ये लोकप्रतिनिधींच्या घरातच शिरलाय कोरोना; नगरसेवकांनाही लागण

Sakal | Friday, 19 June 2020

चिंचवड मतदारसंघातील एका नगरसेविकेसह कुटुंबातील 8 जणांना संसर्ग ​पिंपरी विधानसभा मतदारसंघातील एका नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा पाॅझिटीव्ह

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधींच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. एक-दोन नव्हे तर सर्व कुटुंबालाच बाधा झाली आहे. यात चिंचवड विधानसभा मतदारसंघातील एका नगरसेविकेसह कुटुंबातील आठ जण आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील एका नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा जण पाॅझिटीव्ह आढळले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

चिंचवड विधानसभा मतदार संघातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह कुटुंबातील आठ जणांनाही बाधा झाली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायराॅलाॅजीकडून  त्यांचे रिपोर्ट गुरुवारी रात्री उशिरा आलेत. ही नगरसेविका महापालिका शिक्षण समितीच्या सदस्य आहेत. माजी नगरसेवक असलेल्या त्यांच्या  पतीला दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या हायरिस्क  कॉन्टॅक्ट मध्ये आल्याने नगरसेविकेसह 15 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आता आले आहेत. त्यामध्ये नगरसेविकेसह कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील एका नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत. ते राहात असलेला परिसर दाट लोकवस्तीचा असून सोशल डिस्टंसिंगचा अभाव आहे. या नगरसेवकाच्या शेजारील एका कुटुंबातील पंचवीस जणांना संसर्ग झालेला आहे. त्यांच्यावर दोन दिवसांपासून उपचार सुरू आहेत.

तीन दिवसांपूर्वी संबंधित नगरसेविका महापालिका मुख्यालयातील दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर फिरल्या होत्या. शिक्षण समितीच्या कार्यालयातही गेल्या होत्या. आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या नगरसेविका, अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांचीही तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महापालिकेतील एका उपअभियंत्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे महापालिका मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तसेच, शिक्षण विभागात कार्यरत तीन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.