
Pimpri Chinchwad Election : चिंचवड मतदारसंघांत पहिल्या दोन तासात ३.५२ टक्के मतदान
पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघात आज रविवार २६ फेब्रुवारी रोजी मतदान सुरु आहे. या मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० मतदार केंद्रावर मतदान होत आहे. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत अर्थात मतदानाच्या पहिल्या दोन तासात ३.५२ टक्के मतदान झाले.
255 मतदान केंद्रावर वेबकास्टींग
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील 255 मतदान केंद्रावर वेबकास्टींगच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून तर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन मधील नियंत्रण कक्षातून संपूर्ण मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवून आहेत.
प्रमुख उमेदवारांचे कुटुंबीयांसह मतदान
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू विजय जगताप आणि शंकर जगताप यांच्यासह भाजप उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप व त्यांची कन्या ऐश्वर्या यांनी माध्यमिक विद्यालय पिंपळे गुरवमध्ये मतदान केंद्र क्रमांक 348 येथे मतदान केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपळे सौदागर येथे मतदान केले. दरम्यान, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे व पदाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रास भेट दिली.
अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी वाकड येथील केंद्रावर मतदान केले. कलाटे यांच्या समवेत त्यांच्या आई व माजी नगरसेविका कमल कलाटे, पत्नी वृषाली कलाटे व कुटुंबीयांनी एकत्रितपणे मतदान केंद्रावर येऊन सकाळी आठ वाजता मतदान केले.
दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत २८ उमेदवार असून पाच लाख ६८ हजार ९५४ मतदार आहेत. महायुतीतील भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल उर्फ नाना काटे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बंडखोर अपक्ष राहूल कलाटे या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. मात्र, सहा पूर्वी मतदान केंद्रावर आलेल्या सर्वांना मतदान करता येणार आहे.
भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक होत आहे. यात त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप भाजपच्या उमेदवार आहेत. राष्ट्रवादीचे नाना काटे महापालिका माजी विरोधी पक्षनेता आहेत. तर, कलाटे महापालिकेतील शिवसेनेचे (तेव्हाची शिवसेना, आता ते ठाकरे गटात आहेत) माजी गटनेते आहेत.
सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त असून स्थानिक पोलिसांसह केंद्रीय औद्योगिक पोलिस दल, केंद्रीय राखीव पोलिस दल,
रेल्वे पोलिस दल व इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसही तैनात आहेत. मतदान केंद्र परिसरात केवळ मतदारांनाच प्रवेश दिला जात आहे. संवेदनशील केंद्रावर अधिक बंदोबस्त आहे.