pimpri chinchwad : आंब्याचे कलम तोडल्याने शेतकऱ्याचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 mango tree

pimpri chinchwad : आंब्याचे कलम तोडल्याने शेतकऱ्याचे नुकसान

हिंजवडी : आंबा म्हणजे सर्वांच्याच आवडीचे फळ. ह्याच आंब्याच्या दुर्मिळ व विविध प्रजातींचे जतन व संवर्धन करण्यासाठी आंब्याला केलेले कलम तोडल्याचा प्रकार मारुंजीत नुकताच झाला. शेतकऱ्याचे नुकसान करणाऱ्या राजेंद्र निकम (रा. बुचडे वस्ती, मळगंगा सोसायटी) याच्यावर हिंजवडी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल कारण्यात आला आहे.

या प्रकरणी प्रयोगशील शेतकरी अंकुश राजाराम जगताप यांनी तक्रार दिली आहे. जगताप यांनी पुणे व इतर जिल्ह्यातील दर्जेदार रायवळ आंब्याची कलम करून शेकडो रोपांचे संवर्धन केले आहे. जमीन न विकता आयटी पार्कमध्ये प्रयोगशील शेतीसाठी ते धडपडत आहेत. मात्र वारंवार कलमाच्या फांदया तोडल्याचे प्रकार घडत असल्याने सोमवारी (ता. २५) जगताप यांनी गपचूप पाळत ठेवली असता राजेंद्र निकम हे कलमांचे शेंडे तोडताना नेमके सापडले.

या प्रकाराचे रेकॉर्डिंग करून याबाबत जगताप यांनी हिंजवडी पोलिसांनी कळवले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस ठाण्यात बोलावून घेत गुन्हा दाखल केला. निकम यांना समज देण्यात आली. मात्र, आरोपीने कलमाची पानफुटी तोडली असताना हे सांगूनही हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार महेश शिंदे यांनी तक्रारीत केवळ आंब्याचा पाला तोडल्याचे जाणून बुजून नमूद केल्याचे फिर्यादी अंकुश जगताप यांनी सकाळशी बोलताना सांगितले.