पिंपरी : निवडणूक ‘फिव्हर’ वाढतोय; पक्षांच्या मेळावे, बैठकी सुरू

पिंपरी महापालिका निवडणूक त्रिसदस्यीय पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत.
PCMC
PCMCSakal

पिंपरी - महापालिका निवडणूक त्रिसदस्यीय पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना, मनसे या पक्षांसह अन्य छोट्या पक्षांनीही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मेळावे, बैठकी सुरू केल्या आहेत. मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालये, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जात आहे. तसेच, प्रदेश पातळीवरील नेत्यांनीही शहरावर लक्ष केंद्रित केल्याने निवडणूक फिव्हर चढू लागला आहे.

महापालिका निवडणूक फेब्रुवारीत होणार आहे. त्यासाठी त्रिस्तरीय प्रभाग पद्धतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, त्याबाबतचा आदेश अद्याप निघालेला नाही. त्यामुळे प्रभाग रचनेबाबतचा निर्णय बदलू शकतो, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. शिवाय, त्रिसदस्यीय किंवा बहुसदस्यीय पद्धती छोट्या पक्षांना मारक ठरू शकते, असा आक्षेप नोंदवत छोट्या पक्षांनी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेला विरोध केला आहे. मात्र, निवडणूक कोणत्याही प्रभाग पद्धतीनुसार झाली तरी, मोठ्या दमाने लढवायची असा संकल्पच त्यांनी केला असल्याचे गेल्या आठ दिवसात घडत असलेल्या घडामोडींमुळे स्पष्ट होत आहे. त्यावर टाकलेला दृष्टिक्षेप....

भाजप

भाजपने तीनही विधानसभा मतदार संघनिहाय संघटनात्मक बैठकी सुरू केल्या आहेत. ३४५ शक्तीकेंद्रांच्या प्रमुखांची बैठक होणार आहे. सात ऑक्टोबरला राज्यातील ९० हजार बूथस्तरीय कार्यकर्त्यांशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ऑडिओ कॉलद्वारे संपर्क साधणार आहेत. त्यात ३० हजार कार्यकर्ते असतील, असे मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस

नागरिकांच्या समस्या, अडचणी सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक पक्षाच्या खराळवाडी कार्यालयात दर सोमवारी येणार आहेत. सकाळी अकरा ते दुपारी दोन अशी त्यांची वेळ आहे. तसेच, पक्ष कार्यालयात दर गुरुवारी पक्षाच्या कायदा सेलचे पदाधिकारी कायदे विषयक सल्ला देत आहेत, असे पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले.

काँग्रेस

पक्षाची प्रदेश पातळीवरील बैठक काल झाली. त्रिसदस्‍यीय प्रभाग रचनेस पक्षाचा विरोध आहे. दोन सदस्यीय प्रभाग पद्धती मान्य आहे. या बाबत कॅबिनेटच्या पुढील बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर शहरातील प्रभाग रचनेनुसार नियोजन केले जाणार आहे. सध्या पक्षाच्या वेगवेगळ्या सेलच्या बैठकी सुरू आहेत, असे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस सचिन साठे यांनी सांगितले.

शिवसेना

पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शहरावर लक्ष केंद्रित केले आहे. दोन महिन्यांपूर्वी आकुर्डीत पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभानिहाय बैठकी घेतल्या. किमान पन्नास नगरसेवक निवडून आणून, आगामी महापौर शिवसेनेचाच होणार असा दावा करण्यात येत आहे. रविवारी (ता. २६) ते पुन्हा शहरात येत आहेत.

PCMC
शुल्क वसुल होण्यासाठी शाळा लढवतात नवनवीन शक्कल

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पिंपरी चौकालगतच्या कमला क्रॉस रोड इमारतीत मध्यवर्ती संपर्क कार्यालय साकारत आहे. त्याचे उद्घाटन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते नवरात्रोत्सवात किंवा त्यानंतर करण्याचे नियोजन आहे. प्रभाग रचना कितीही सदस्य पद्धतीने झाली तरी, पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्याचा संकल्प पक्षाने केला आहे, असे महापालिकेतील गटनेते सचिन चिखले यांनी सांगितले.

रिपब्लिकन

भारतीय रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) महापालिकेसह मावळ तालुक्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाच्या शहराध्यक्षपदाची निवडणूक १० ऑक्टोबरला होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्या संदर्भात वडगाव मावळ येथे पक्षाचे जिल्हा प्रभारी सूर्यकांत वाघमारे व प्रदेश महिला सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे यांच्या उपस्थितीत झाला. त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीला पक्षाचा विरोध आहे.

वंचित बहुजन आघाडी

महापालिका निवडणूक तिसदस्यीय पद्धतीने घेण्यास वंचित बहुजन आघाडीने विरोध केला आहे. प्रसंगी आघाडीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र लढा उभारणार असल्याचे आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी सांगितले. दरम्यान, पक्षाच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी पिंपरीत शुक्रवारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन भाजप व राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

एमआयएम

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पुढील महिन्यात पक्षाचे खासदार इम्तिहाज जलील शहरात येणार आहेत. कार्यकर्त्यांची बैठक व प्रशिक्षण शिबिर होणार आहे, असे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी दिली. २०१७ च्या निवडणुकीत पक्षाने १४ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यात एक हजारांपेक्षा अधिक मते प्रत्येक उमेदवारांनी घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com