सर, डिजिटल शाळा म्हणजे काय हो?

सुवर्णा नवले
Sunday, 16 August 2020

चार महिन्यांपासून विद्यार्थी ऑनलाइन अभ्यासापासून वंचित

पिंपरी : चिखली-सोनवणे वस्ती येथे पत्राशेडमध्ये राहणारे भूल कुटंबीय. एकाच कुटुंबातील चार लहान भाऊ-बहीण महापालिकेच्या सोनवणे वस्ती क्र. ९३ शाळेत शिक्षण घेत आहेत. मार्चपासून सुरू झालेली डिजिटल शाळा काय आहे, ऑनलाइन कसं यायचं, आपण शिक्षकांशी मोबाईलवर कसे जोडले जातो, इंटरनेट काय असतं, आपले मित्र आपल्याला ऑनलाइन दिसतात का? यातलं त्यांना काहीच माहिती नाही. कारण या कुटुंबातील एकाही सदस्याकडे स्मार्टफोन नाही. साधा बटणाचा मोबाईल भूल कुटुंब वापरत आहे. अशीच परिस्थिती महापालिका शाळेतील 40 टक्‍क्‍यांहून अधिक ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांची आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तुलसी भूल यांना चार मुले. वडील कंपनीत सुरक्षारक्षक. पुष्पराज इयत्ता पहिलीत, मंजू तिसरीत, अंजू चौथीमध्ये व आरती आठवीमध्ये आहे. आई-वडिलांना मुले दिवसभर काय अभ्यास करतात, हे समजत नाही. कारण दोघेही अशिक्षित. महापालिकेच्या शाळेत झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातही स्थलातंरित व परप्रांतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बहुभाषिक विद्यार्थी वीस ते पंचवीस टक्के आहेत. जेमतेम मराठी समजेल किंवा हिंदी, अशी परिस्थिती या मुलांची आहे. मात्र, यातील प्रत्येक कुटुंबाला आपल्या पाल्याला शिकविण्याची तळमळ आहे. केवळ ऑनलाइन शिक्षणाच्या सचोटीमुळे ही मुले शिक्षणापासूनच वंचित राहिल्याचे समोर आले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भूल म्हणाल्या, "थोडा वेळ मुले घरी पुस्तके घेऊन बसतात. पण दिवसभरात मुलांनी काय अभ्यास केला, याचं मुल्यमापन करता येत नाही. त्यातही इंग्रजी आणि गणित वगळून अभ्यास सूरू असतो. मुलांना समजलं नाही, हे विचारण्यासाठी शिक्षकांना वारंवार कॉल करता येत नाही. मोबाईलमध्ये तेवढा रिचार्ज नसतो. एकदा रिचार्ज संपला, तर दुसरा रिचार्ज लवकर करता येत नाही. पती कामाला गेल्यानंतर संध्याकाळी घरी आल्यावर शिक्षकांसोबत मुलांचा संपर्क होतो. त्यानंतर स्वाध्याय आणि काही विषयांचे टेस्टपेपर दिले जातात. यातील प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांनी कशा आणि किती सोडवल्या हे समजत नाही. ते जमा करण्यासाठी पुन्हा शिक्षकांना खटाटोप करावा लागतो. त्यामुळे ऑफलाइन अभ्यासावर शिक्षकांविना पालक भर देणार तरी कसा? शिक्षकांनाही सोशल डिस्टन्स पाळावे लागत आहे. कोरोनाची धास्ती वेगळीच. त्यामुळे शिक्षकही या वाड्या वस्त्यांवर पोहोचणार कसे, हा मोठा प्रश्‍न आहे."

Image may contain: 2 people, people standing
चिखली : ऑफलाइन शिक्षणाच्या माध्यमातून वाड्या-वस्त्यांवर जाऊन शिक्षण देताना शिक्षक.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रभारी उपप्राचार्य रामदास मेचे म्हणाले, "गेल्या पंधरा वर्षांपासून चिखली गावठाण भागात शिक्षणापासून वंचित व हातावर पोट असलेल्यांची मुले शिक्षण घेत आहेत. मात्र, आठवड्यातून या मुलांशी संपर्क होतो. जवळपास तीस टक्‍क्‍यांहून अधिक मुलांकडे मोबाईल नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. मोबाईल असले, तरी पुरेसे नेटवर्क नाही. वायफाय सुविधा या मुलांना नाही. उत्तर प्रदेश, बिहार, नेपाळ या भागातून वीटभट्टी, उसतोड कामगारांची मुले महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. यांना ऑनलाइन शिक्षित करणे हे आमच्यापुढे मोठे आव्हान आहे."

अनेकांना जुने मोबाईल देण्याची विनंती केली आहे. ज्यामुळे आम्ही डिजिटल शिक्षणावर घेतलेली मेहनत या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. ज्यांच्या घरी टिव्ही आहे. त्या टिव्हीवर मी पेनड्राईव्ह जोडून विद्यार्थ्यांनी कसं शिकावं, याची माहिती देत आहे. तसेच, नोट्‌सही पुरवीत आहोत. मात्र, हवं तसं शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. ही सल मनात राहते. ब्लॉगस्पॉट, लिंक, विविध ऍपच्या माध्यमातून अधिक उत्तम अभ्यास करता येऊ शकतो.
- दयानंद यादव, शिक्षक, चिखली, सोनावणे वस्ती शाळा क्र.93   

Edited by Shivnandan Baviskar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad municipal school students deprived of online education