अडीच वर्षांनी 'त्या' खुनाचा लागला छडा;चार आरोपी अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 February 2021

मावळ तालुक्यातील बेबडओहळ येथे नदीपात्रात मृतदेह दगड बांधून पाण्यात टाकून दिल्याची घटना घडली होती. खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला  यश आले.

पिंपरी - अडीच वर्षांपूर्वी खून करून मावळ तालुक्यातील बेबडओहळ येथे नदीपात्रात मृतदेह दगड बांधून पाण्यात टाकून दिल्याची घटना घडली होती. तब्बल अडीच वर्षानंतर या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला  यश आले.

सहदेव मारुती सोळंकी (रा. सावनगिरा ता.निलंगा जि. लातूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शंकर ब्रह्मदेव शिंदे (रा. ओटास्कीम, निगडी), रवी अशोक मोरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचे साथीदार अमोल वाले आणि मेघराज वाले यांच्यावर पोलिसांनी मोक्काची कारवाई करून त्यांना यापूर्वीच अटक केली आहे. 

हे वाचा - मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार; स्मशानभूमीतील बेड चोरट्यांनी पळवला!

सहदेव हा दादागिरी करुन त्याचा मित्र शंकर शिंदे यालाही सतत दारु पिवुन शिवीगाळ करीत असल्याने शंकर शिंदे सहदेववर चिडून होता.  दरम्यान, ऑगस्ट 2018 मध्ये शंकर शिंदे याने त्याचे साथीदार रवि अशोक मोरे, अमोल बसवराज वाले, आणि राज्या उर्फ मेघराज संजय वाले यांना दारु पिण्यासाठी बोलावून घेतले. सहदेव याला ठार मारण्याचा या आरोपींनी दारू पिताना कट रचला. त्यानंतर एमआयडीसीच्या मोकळ्या जागेत नेऊन त्याचा गळा आवळुन खून केला.

सहदेवचा मृतदेह दिवसभर मोटारीत ठेवून दुसऱ्या दिवशी रात्री मावळ तालुक्यातील परंदवाडी ते बेबडओहाळ गावच्यामध्ये असलेल्या पवना नदीवरील पुलावरून मृतदेहाला दगड बांधून नदीत टाकून दिला. दहा ते बारा दिवसांनी मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पाण्यातून बाहेर आला.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मृत व्यक्तीच्या खिशात सापडलेल्या पॅन कार्डवरून त्याची ओळख पटविण्यात आली. या घटनेला अडीच वर्ष उलटल्यानंतर 8 फेब्रुवारी 2021 ला युनिट दोनच्या पोलिसांना माहिती मिळाली की, हे आरोपी निगडी परिसरात फिरत आहेत. पोलिसांनी अंकुश चौकात सापळा लावून शंकर शिंदे आणि रवी मोरे यांना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी हा खून केल्याचे सांगितले. याबाबत तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri-Chinchwad Police Crime Branch Unit 2 succeeded in solving the murder case