पिंपरी-चिंचवडसाठी आनंदाची बातमी; स्वच्छ भारत अभियानात शहराने घेतली उभारी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 August 2020

2019-20 या वर्षी देशातील चार हजार 242 शहरे सहभागी झाली.

पिंपरी : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड शहराने देशात 24 वा आणि राज्यात सातवा क्रमांक पटकविला आहे. गुरुवारी दुपारी निकाल जाहीर करण्यात आला. केंद्र सरकारच्या नागरी कार्य व गृहनिर्माण विभागातर्फे 2016 पासून ही स्पर्धा घेण्यात येत आहे. 

स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत पिंपरी-चिंचवडने 2016 मध्ये नववा क्रमांक पटकविला होता. त्या वेळी 73 शहरांनी सहभाग घेतला होता. 2019-20 या वर्षी देशातील चार हजार 242 शहरे सहभागी झाली. शहराची सेवास्तर प्रगती, थेट निरीक्षण, नागरिकांचा अभिप्राय आणि प्रमाणपत्र अशा चार पातळ्यांवर परीक्षण करण्यात आले. प्रत्येक विभागासाठी एक हजार 250 गुण या प्रमाणे पाच हजारपैकी गुण देण्यात आले. 

थेट खरेदीवरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत खडाजंगी

सेवा स्तरामध्ये कचरा संकलन व वाहतूक, प्रक्रिया व विल्हेवाट, स्वच्छता, माहिती शिक्षण व प्रसारण, नवीन उपक्रम व माहिती, उपविधी, क्षमता चाचणी यानुसार गुणांक देण्यात आले. प्रमाणपत्रामेध्य स्टार रेटिंग 80 टक्के आणि वैयक्तिक स्वच्छतागृहे 20 टक्के या प्रमाणात गुणांक ठरलेले होते. निवासी व व्यापारी परिसराची स्वच्छता, सामुदायिक व सार्वजनिक स्वच्छतागृहे, त्याबाबतचा संदेश, स्वच्छतागृहांची सुरक्षितता, भाजी मंडईची साफसफाई. रेल्वेस्टेशन व बसथांब्याची स्वच्छता, स्वच्छ सर्वेक्षण जनजागृती फलक, झोपडपट्टी व कचऱ्याचे ढीग, सुशोभिकरण याबाबत थेट निरीक्षण नोंदविण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षणाबाबत जनजागृती, स्वच्छतेबाबत समाधान, घरगुरी व व्यापारी भागातील परिस्थिती, कचरा विलगीकरणाची सूचना, कचरा कुठे नेला जातो? याबाबतची माहिती, स्वच्छतागृहांचा वापर, शहर हागणदारीमुक्त करणे, स्वच्छता ऍपचा वापर याबाबत नागरिकांचा प्रतिसाद जाणून घेण्यात आला. 

गणरायाच्या स्वागताला उद्योगनगरी सज्ज; अशी चाललीय खरेदीची लगबग

असे मिळाले गुण 

  • 2016 : पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ भारत अभियानात 2016 मध्ये सहभागी झाले. त्या वेळी देशातील 73 शहरे सहभागी झाली होती. त्या वेळी शहराने देशात नववा क्रमांक पटकविला होता. 
  • 2017 : 2017 मध्ये दोन हजार गुणांनुसार निकाल देण्यात आला. या वर्षी देशातील 434 शहरे सहभागी झाले होते. पिंपरी-चिंचवड 72 व्या क्रमांकावर घसरले होते. 
  • 2018 : 2018 मध्ये चार हजार गुणांद्वारे परीक्षण करण्यात आले. त्या वर्षी देशातील चार हजार 203 शहरे सहभागी झाले होते. पिंपरी-चिंचवडला 43 वा क्रमांक मिळाला होता. 
  • 2019 : केंद्र सरकारने 2019 मध्ये चार मुद्यांद्वारे सर्वेक्षण केले. प्रत्येकी साडेबाराशे गुण होते. या वर्षी चार हजार 203 शहर सहभागी झाले होते. पिंपरी-चिंचवडला 52 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. 

Edited by Shivnandan Baviskar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad ranks 24th in country in swachh bharat abhiyan