पिंपरी-चिंचवड : शिवसेनेला गटबाजीचा चक्रव्यूह भेदावा लागेल

Shivsena
Shivsena

पिंपरी - महापालिका निवडणूक वर्षभरावर आली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शहरात शिवसेना पक्ष म्हणून कमजोर आहे. तरीही नेतेमंडळी आपल्याच सहकाऱ्यांना संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्येक नेत्याचा स्वतंत्र गट आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत यश मिळवायचे असेल, तर स्वतःच तयार केलेल्या गटबाजीच्या चक्रव्यूहातून त्यांना बाहेर पडावे लागणार आहे. महापालिकेची मागील निवडणूक स्वतंत्र लढताना शिवसेनेने १२८ नगरसेवक निवडून आणण्याची घोषणा केली होती. त्यासाठी दोन खासदार, एक आमदार, संपर्क प्रमुख, शहरप्रमुख, सर्व पदाधिकारी कामाला लागले. परंतु १२८ जागांसाठी सर्वत्र उमेदवारही मिळाले नव्हते. 

अवघे नऊ जण निवडून आले. २०१७ ते २०१९ पर्यंत महापालिका, राज्य आणि केंद्र अशा तीनही ठिकाणी भाजपची सत्ता होती. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाआघाडीची सत्ता स्थापन झाली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने खेड्यापाड्यातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या अंगी बळ संचारले. राज्यभरात स्थानिक पातळीवरील भाजपच्या सत्तेविरोधात निदर्शने, आंदोलने, मोर्चे काढून दंड थोपटणे सुरू झाले. शहरात मात्र वेगळेच चित्र आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नऊ नगरसेवकांनी मिळून एकदाही एकत्र येऊन प्रशासनाविरोधात किंवा भाजप विरोधात काही धोरण ठरविल्याचे दिसलेले नाही. शिवसेना, महिला आघाडी, कामगार सेना, विद्याथी सेनेचे पदाधिकारी आहेत. मात्र, काही वर्षांपासून कोणात समन्वय नाही. महापालिका गटनेत्यासोबत नगरसेवक नव्हेच एखादा कार्यकर्ताही दिसत नाही. महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत खासदारांना पत्रकार परिषद घ्यावी लागते. त्यालाही नगरसेवक उपस्थित राहत नाही. यावरून गटबाजी समोर येते.

‘स्थायी’वरून नाराजी? 
नगरसेवकांना एक-एक वर्ष स्थायी समिती सदस्यपद मिळावे, असा फॉर्म्युला सुरुवातीलाच निश्चित झाला होता. मात्र, सुरुवातीची दोन वर्षे अमित गावडे यांना संधी मिळाली. नंतरची गेली दोन वर्षे गटनेते राहुल कलाटे सदस्य आहेत. त्यामुळे इतर नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. आता महिनाभरात कलाटे यांचा स्थायीचा कार्यकाल संपत आहे, त्यामुळे त्या जागी कोणाची वर्णी लागणार यावरूनही गोंधळ सुरू आहे. 

गटबाजीने पक्षाचे वाटोळे
अंतर्गत गटबाजीने पोखरलेल्या परिस्थितीवर पक्षातीलच एका बड्या नेत्याने ‘गटबाजीने शिवसेनेचे वाटोळे केले’ असे थेट विधान केले होते. तसेच गटबाजी संपवा, असा आदेशही दिला होता. मात्र, त्यानंतरही गटबाजी संपविण्यासाठी काही विशेष प्रयत्न होताना दिसत नाही. 

आंदोलनांऐवजी गटबाजी 
अन्यायाविरोधात पेटून उठणे; आंदोलने, मोर्चे काढून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे ही शिवसेनेची ओळख आहे. मात्र, शहरातील कार्यकर्त्यांनी गेल्या चार वर्षांत एकही उल्लेखनीय आंदोलन केले नाही. नगरसेवक सभागृहात बोलत नाहीत, स्थायीमध्येही आवाज दिसून येत नाही. त्यामुळे ना आंदोलने, ना मेळावे, ना पक्षवाढीचे काम, फक्त आणि फक्त गटबाजी एवढीच ओळख पक्षाची निर्माण झाली आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com