Pimpri Chinchwad : पवना धरणग्रस्तांनी आडवले पिंपरी चिंचवडचे पाणी; पवनानगरला आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri Chinchwad water blocked Pavana dam victims protest Pavananagar

Pimpri Chinchwad : पवना धरणग्रस्तांनी आडवले पिंपरी चिंचवडचे पाणी; पवनानगरला आंदोलन

पिंपरी/पवनानगर : पिंपरी चिंचवड मावळ तालुक्यातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. दररोज साधारण १२०० क्युसेक प्रमाणे दुपारी चार ते पहाटे चार या वेळेत वीजनिर्मिती केंद्रातून पाण्याचा विसर्ग केला जातो.

मात्र, मंगळवारी सकाळी धरणग्रस्तांनी पवनानगर येथून धरणापर्यंत मोर्चा काढला आणि धरणाच्या भिंतीकडे जाणाऱ्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. आमदार सुनील शेळके यांनी आंदोलकांचे नेतृत्व केले.

धरणग्रस्त ८६३ शेतकऱ्यांना प्रत्येकी चार एकर जमीन मिळाली, प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी मिळावी, या प्रमुख मागण्या आहेत. त्यासह अन्य मागण्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी पवनानगर बाजारापेठेतून मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.

तेव्हा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू नका. गोळ्या घाला पण शेतकऱ्यांची अडवणूक करू नका, असे म्हणत मोर्चा धरणाच्या गेटमधून आत नेला. मोर्चेकऱ्यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा बंद केल्याचे सांगण्यात येत आहे.

धरणग्रस्तांशी चंद्रकांत पाटील यांनी साधला संवाद

धरणग्रस्तांशी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फोनद्वारे साधला संवाद, १९ मे ला बैठक बोलावून तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आमदार सुनील शेळके यांनीदेखील धरग्रस्तांची कैफियत मांडली.