भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत पिंपरी-चिंचवडच्या 'या' पाच जणांची वर्णी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

  • प्रदेश कार्यकारिणी सचिवपदी अमित गोरखे 
  • महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी उमा खापरे 
  • कायदा सेलच्या सहसंयोजकपदी ऍड. सचिन पटवर्धन 
  • प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी एकनाथ पवार, सदाशिव खाडे 
  • निष्ठावंत कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा प्रदेश पातळीवर संधी 

पिंपरी : भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणी व विविध सेलच्या नियुक्‍त्या अखेर शुक्रवारी करण्यात आल्या. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडच्या पाच जणांची वर्णी लागली आहे. यात प्रदेश कार्यकारिणी सचिवपदी (मंत्री) अमित गोरखे, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी उमा खापरे, कायदा सेलच्या सहसंजोजकपदी ऍड. सचिन पटवर्धन आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी एकनाथ पवार व सदाशिव खाडे यांची नियुक्ती झाली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा प्रदेश पातळीवर भाजपने संधी दिल्याचे कार्यकारिणीवरून दिसून येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार असताना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अमित गोरखे यांच्याकडे होती. त्यांची वर्णी आता भाजप प्रदेश कार्यकारिणीवर सचिवपदी (मंत्री) लागली आहे. 'सकाळ'शी बोलताना गोरखे म्हणाले, "अनपेक्षितपणे इतक्‍या मोठ्या पदाची जबाबदारी मिळाली आहे. प्रदेश पातळीवर काम करायला मिळणार आहे. खुलेपणाने काम करायला मिळणार आहे. एखाद्या सेलेचे पद मिळेल, असे अपेक्षित होते. सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष म्हणजे भाजप. हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.'' 

Image may contain: 2 people
अमित गोरखे 

पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या संघटन बांधणीत मोलाची कामगिरी असलेल्या उमा खापरे यांच्याकडे महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी आली आहे. नियुक्ती बाबत त्या म्हणाल्या, "इतके वर्षे पक्ष संघटनेचे एकनिष्ठेने काम केल्याचा न्याय मिळाला आहे. पदाचा वापर राज्यात संघटना बांधणीसाठी करणार आहे. यापूर्वी राज्यात काम केले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी ओळखीचे झाले आहेत. त्याचा फायदा आता होणार आहे. जोमाने काम करता येणार आहे.'' 

Image may contain: 2 people
उमा खापरे 

कायदा सेलच्या सहसंयोजकपदी ऍड. सचिन पटवर्धन यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्षपदही भुषविले आहे. नियुक्ती बाबत पटवर्धन म्हणाले, "पूर्वी एनजीओ, सहकार अशा सेलचे काम केले आहे. लोक लेखा समितीच्या कामाचा अनुभव आहे. पक्षाने आता कायदा विभागाची जबाबदारी दिली आहे. ती निष्ठेने करणार. आधी मी एक स्वयंसेवक आहे. त्यामुळे जबाबदारीने काम करत आलो आहे. आता पुन्हा पक्षाने संधी दिली आहे.'' 

Image may contain: 1 person, sitting
ऍड. सचिन पटवर्धन 

एकनाथ पवार सध्या नगरसेवक आहेत. 2017 च्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता आल्यानंतर पक्ष नेते पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली होती. जवळपास तीन वर्षे त्यांनी यशस्वीरित्या सभागृह चालविले आहे. सभागृहात पहिल्यांदाच आलेले असले तरी मुरब्बी राजकारण्याप्रमाणे त्यांची भूमिका राहिली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एक प्राध्यापक व भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता अशी सदाशिव खाडे यांची ओळख आहे. शहर भाजपच्या संघटन बांधणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार असताना त्यांच्याकडे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. जवळपास दीड वर्षे त्यांनी काम पाहिले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad's five members in the BJP's state executive