esakal | पिंपरी : कोरोनायोद्धे ‘या’ मागण्यांसाठी उतरले रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी : कोरोनायोद्धे ‘या’ मागण्यांसाठी उतरले रस्त्यावर

पिंपरी : कोरोनायोद्धे ‘या’ मागण्यांसाठी उतरले रस्त्यावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी ः कोरोनाकाळात गेल्या वर्षापासून डॉक्टर, परिचारिका जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा करीत आहेत. त्यांना ‘फ्रंटलाइन योद्धे’ असे संबोधून त्यांचे कौतुक केले जात आहे. मात्र, शाब्दिक कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा, असे म्हणत विविध मागण्यांसाठी कोविड योद्धा बचाव कृती समितीतर्फे सलग दुसऱ्यादिवशी आंदोलन सुरू होते. कोरोनाच्या काळात ‘आम्ही कुठे कामात थांबलो नाही, काम करत राहिलो. ’ महापालिका मात्र आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही, ही खेदाची बाब असल्याची खंत आंदोलक व्यक्त करत आहेत. आता यावर आयुक्त कसा मार्ग काढणार, याकडे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून महापालिकेच्या विविध रूग्णालयात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, परिचारीका, लॅब टेक्‍निशियनसह वॉर्डबॉय, मावशीबाई असे ५००हून अधिक कर्मचारी मानधनावर काम करत आहेत. या आंदोलनात महापालिकेच्या पिंपरी जिजामाता, आकुर्डी, थेरगाव, वायसीएम, चिंचवड- तालेरा, भोसरी रूग्णालयातील मानधनावरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या आंदोलनात डॉ. तन्वी दातीर, डॉ. प्रतिमा मटोले, डॉ. मीनल देवकाते, डॉ. अनिता भट्टड, डॉ. मीना, लॅबटेक्‍निशियन स्वप्निल जोशी, परिचारीका लिला कोकणे, सविता काटे, मावशीबाई शुभांगी यंकुळे, मीना गवई, भारती कांबळे आदींनी सहभाग घेतला.

हेही वाचा: नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री मराठवाड्याचा दौरा करणार

कोविड योद्धा बचाव कृती समिती अध्यक्ष सागर यल्लाळे म्हणाले, ‘‘महापालिका ठेकेदारांवप कशाला पैशाची उधळपट्टी करत आहे. याची उकल होत नाहीये. एका वॉर्डबॉयला २० हजार ५०० वेतन मिळत आहे. आता ठेकेदाराला एकासाठी२३ हजार ६९१ देणार आहेत. हे कशासाठी? स्थानिकांना काम द्या.’

आकुर्डी रूग्णालयाचे डॉ. वैभव कर्णे म्हणाले, ‘‘गेल्या वर्षापासून कोविडकाळात काम करत आहोत. तेव्हा कायम सेवेतील डॉक्टरांनी पाठ फिरवली होती. तेव्हा आम्ही जोखीम पत्कारून सेवा दिली. आता मात्र १५ दिवसांच्या मुदत दिल्यावर आम्ही कसं काम करणार? सगळा मनमानी कारभार सुरू आहे. आता आमच्यावर ठेकेदारी पद्धत लादत असल्याने आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आपापल्या हक्कांसाठी या कोविड योद्धे रस्त्यावर उतरले आहेत. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. ’’

मासुळकर कॉलनी आय रूग्णालयाच्या परिचारीका करूणा समुर्दे म्हणाल्या, ‘‘कोरोनामध्ये रुग्णांसोबत काम करणाऱ्या परिचारिकांना न्याय मिळाला पाहिजे. आम्हावर ठेकेदारी पद्धत लादू नये, आम्हाला मानधनावर कायम ठेवावे. ठेकेदारीमुळे वेतनात मोठी कपात करून पिळवणूक केली जाक आहे. ’’

डॉ. रोहन पाटील म्हणाले, ‘‘येत्या ३० सप्‍टेबरमध्ये आमचे कंत्राट संपत आहे. ठेकेदार मनमानी पद्‍धतीने अटीशर्थी लादत आहेत. अशाप्रकारामुळे वर्षभर काम करूनही बोनस मिळण्यास अडचणी येतील. आम्हाला महापालिकेने मानधनावर काम द्यावे. ठेकेदार आमच्याशी आतापासूनच उद्धट बोलत आहेत.’’

डॉ. काजोल मारूडकर म्हणाले, ‘‘शासनाच्या कायद्यानुसार वर्ग एक आणि दोनच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांना सरकारने थेट करणे आवश्‍यक आहे. पण महापालिका आमच्या भावनांशी खेळत आहे. त्यांनी आम्हांला ठेकेदारांकडे सोपवू नये. आतातर होमिओपॅथिक डॉक्टरांना काम नाकारले आहे. कोविडची तिसरी लाट येण्याच्या शक्यता असताना आम्हाला घरचा रस्ता दाखवला जात आहे. ’’

मावशी सुषमा कावलकर म्हणाल्या,‘‘आम्ही खासदार, आमदार यांच्याकडे न्याय मागितला. पण एकही आमच्या मदतीला धावले नाहीत. याउलट न्यायालयात धाव घेतल्यामुळे आमच्यातील ३० जणांना घरी बसविले आहे. आता न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्‍न पडला आहे.’’

loading image
go to top