
पिंपरी : कचरापेट्या खरेदीसाठी महापालिकेने फेरनिविदा मागविल्या
पिंपरी - महापालिकेच्यावतीने ३२ प्रभागांमध्ये प्रत्येकी ५० नग याप्रमाणे १२० लिटर क्षमतेच्या एकूण १६०० कचरापेट्या खरेदी करण्यात येणार आहेत. फेब्रुवारीमध्ये खरेदीसाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेस कोरोना महामारीमुळे विलंब झाला. मात्र या निविदा प्रक्रियेत एकही ठेकेदार पात्र झाला नसल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा मागविल्या आहेत.
महापालिका आरोग्य विभागासाठी कचरा समस्या उग्र होत चालली आहे. त्यासाठी प्रभागनिहाय ३२ प्रभागांमध्ये प्रत्येकी ५० नग याप्रमाणे १२० लिटर क्षमतेच्या एकूण १६०० कचरापेट्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ३५ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. त्या अनुषंगाने १८ फेब्रुवारी २०२० रोजी निविदा मागविल्या. या निविदा प्रक्रियेत १२ ठेकेदारांनी सहभाग घेतला. मात्र, या कालावधीत कोरोना संसगार्मुळे खरेदीमुळे निविदा प्रक्रियेस बराच विलंब झाला. त्यातच सहभागी झालेल्या १२ ठेकेदारांपैकी एकही ठेकेदार पात्र होत नसल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर नव्याने फेरनिविदा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, ३२ प्रभागांमध्ये १२० लिटर क्षमतेच्या एकूण १६०० कचरापेट्या खरेदी करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.