esakal | Pimpri : डिझेलअभावी पीएमपीला ‘ब्रेक’
sakal

बोलून बातमी शोधा

PMP Bus
पिंपरी : डिझेलअभावी पीएमपीला ‘ब्रेक’

पिंपरी : डिझेलअभावी पीएमपीला ‘ब्रेक’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) काही गाड्यांना डिझेल तुटवड्याअभावी ब्रेक लावण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. गेल्या आठवड्याभरात लांब पल्ल्यावरील गाड्यांमधील डिझेल संपल्याच्या दोनदा घटना घडल्या आहेत. परिणामी, पीएमपी मार्गावरील वाहनांच्या वेळापत्रकाचे नियोजन बिघडल्याने काही अंशी पीएमपी प्रशासनाला आर्थिक तोटा सहन करावा लागल्याचे समोर आले आहे.

पिंपरी-चिंचवड पीएमपीच्या मार्गावर सध्या ६० च्यावर गाड्या आहेत. यासाठी दररोज साडेतीन ते चार हजार लिटर डिझेल लागते. ११ ऑक्टोबरला सकाळी वाहनांमधील डिझेल संपल्याने गाड्या जागेवर ठप्प राहिल्या. परंतु, महाराष्ट्र बंद असल्याने जादा गाड्यांची गरज भासली नाही. ऐन सणासुदीच्या काळात वाहनांची गरज मोठ्या प्रमाणावर भासते, अशावेळी गाड्यांची कमतरता भासते. एकीकडे कोरोनामुळे पीएमपीचे गाडे रुळावर येण्यासाठी वेळ लागत आहे. अशा परिस्थितीत अशा घटनांमुळे पीएमपीला फटका बसत आहे.

हेही वाचा: Corona Update : पिंपरी-चिंचवडमध्ये ९६ नवीन रुग्ण

एक डिझेल टॅंकर १२ हजार लिटरचा आहे. टॅंकर शुद्धीकरण करून खाली करण्यासाठी दोन तास लागतात. शनिवारी व रविवारी इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड बंद असते. अशावेळी पुरवठ्याअभावीदेखील अनेकदा डिझेल तुटवड्याच्या घटना घडत आहेत. मागील आठवड्यात तीन ते चार गाड्यांमधील डिझेल संपल्यानंतर स्वारगेट व शिवाजीनगरहून गाड्या मागवाव्या लागल्या. डिझेलअभावी २०० ते ३०० किलोमीटर पल्ल्यावर जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बिघडत आहे. शिवाय इतर मार्गावरच्या गाड्यांच्या नियोजनातही बदल होत आहे. बरेचदा ज्या गाड्या उपलब्ध असतील त्या गाड्या दुसऱ्या मार्गावर फिरवल्या जात आहेत. परंतु, अशा प्रकारे गाड्यांमध्ये बदल करणे प्रशासनाला गैरसोयीचे होत आहे.

डिझेलचा तुटवडा जाणवल्यास गाड्या बदली कराव्या लागत आहेत. परंतु, फेऱ्या रद्द केल्या जात नाहीत. गाड्यांना गर्दी कमी असल्याने तोटा झाला नाही. एका मार्गावर जादा गाड्या असल्यास त्या दुसऱ्या मार्गावर सोडतो. पिंपरी-चिंचवड मध्येच नव्हे तर सर्व डेपोंमध्ये या अडचणी सुरू आहेत. डिझेलच्या खर्चाचे नियोजन पुणे विभाग पातळीवर आहे.

- हनुमंत गोसावी, आगार व्यवस्थापक, वल्लभनगर

loading image
go to top