पिंपरीगावातील डेअरी फार्मच्या जंगलात मोठी आग; चारशे झाडे होरपळली

डेअरी फार्म : जंगलात लागलेल्या आगीत गवत खाक झाले, तसेच झाडेही होरपळली.
डेअरी फार्म : जंगलात लागलेल्या आगीत गवत खाक झाले, तसेच झाडेही होरपळली.

पिंपरी - पिंपरीगावातील डेअरी फार्म येथील तीन वर्षांपासून जतन केलेली तब्बल चारशे झाडे आगीत होरपळली. मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाल्याने वृक्षप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. डेअरी फार्म येथे २०१९ मध्ये साडेआठ हेक्टर जागेत महापालिकेने विविध जातीची दहा हजार झाडे लावली आहेत. त्यांचे संगोपन वनविभागाकडून केले जात आहे. दरम्यान, बुधवारी (ता. २४) सायंकाळी सहाच्या सुमारास येथील झाडांना अचानक आग लागली. वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यासह सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत तातडीने अग्निशामक विभागाला माहिती दिल्यानंतर संत तुकारामनगर मुख्य अग्निशामक विभागाची एक व रहाटणी उपकेंद्राची एक अशा दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 

दरम्यान, आग पसरत होती. तसेच एक-एक झाड आगीच्या भक्ष्यस्थानी येत होते. अग्निशामक विभागाचे जवान दाखल झाले. मात्र, घटनास्थळी पोचण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्याने गाडी त्याठिकाणी पोचू शकली नाही. त्यामुळे अग्निशामक विभागाच्या वाहनातून वनविभागाच्या टँकरमध्ये पाणी भरून घटनास्थळापर्यंत पोचवले. अग्निशामक  व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकीकडे पाण्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू असताना आग पसरू नये यासाठी झाडाच्या फांद्यांनीही आग विझविण्याचा प्रयत्न केला. तरीही सुमारे चारशे झाडे जळाली. साडे तीन तासांच्या प्रयत्नानंतर अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विविध जातींची झाडे जळाली
साडे आठ हेक्टर क्षेत्रावर दहा हजार वृक्षांचे रोपण केलेले असून,  बुधवारी घडलेल्या घटनेत त्यातील साडे तीन हेक्टर क्षेत्रावरील वाढीला लागलेली चार ते पाच फूट उंचीची सुमारे चारशे झाडे जळाली. यामध्ये वड, पिंपळ, चिंच, शिस आदी झाडांचा समावेश आहे.

आग विझविण्यासाठी चार तास प्रयत्न 
आग विझविण्यासाठी फायरमन विष्णू चव्हाण, निखिल गोगावले, सरोज फुंडे, मयूर कुंभार, जालिंदर जाधव, चेतन पुजारी, रोहित आवारी यांच्यासह वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश गुरव, वनपाल एस. एन. शेळके, वनरक्षक बी. आर. मोरळे, सुरक्षारक्षक सुरेश कासदेकर, संतोष पवार, दीपक जांभेकर, कुंडी चिमोटे, किसन चिमोटे, तुळशीराम बेलसरे, संजय भास्कर, संदेश कासदेकर, सचिन बेलसरे, पंकज बेलसरे, केवल बेलसरे, मेलकाई चिमोटे, रामलीला बेलसरे, बाबूराव पवार यांनी चार तास प्रयत्न केले. 

नदीकाठी रंगतात पार्ट्या
डेअरी फार्मचे कुंपण काही ठिकाणी तुटले आहे. येथून नदीकाठच्या बाजूने काहीजण आत येतात. रात्री अंधार पडल्यानंतर पार्ट्या रंगतात. सिगारेट, गांजाची नशा केली जाते. दरम्यान, अर्धवट जळालेली सिगारेट टाकल्याने अथवा आगकाड्या टाकल्याने आगीच्या घटना घडत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

याठिकाणी दहा हजार वृक्षांचे रोपण केले असून, त्यांचे संगोपन केले जात आहे. यातील चारशे झाडे आगीत जळाली. या प्रकरणाचा पंचनामा केला असून, पोलिसातही तक्रार देणार आहे. रात्री नदीकाठच्या परिसरातून अनेकजण त्याठिकाणी येत असतात. अशा लोकांना जरब बसण्यासाठी आम्ही गस्त घालत असतो. मात्र, पोलिसांचीही गस्त आवश्यक आहे. दरम्यान, आता याठिकाणी आणखी झाडांचे रोपण करणार आहे.
- गणेश गुरव, वनपरिक्षेत्र अधिकारी

इतक्या मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होणे ही गंभीर बाब आहे. वृक्षारोपणानंतर त्या भागातील गवताची वेळोवेळी छाटणी करणे आवश्यक आहे. ऑक्टोबरनंतर गवत छाटणी अत्यावश्यक असते. मात्र, त्याकडे संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जाते. गवताची वाढ होऊन आग लागल्यास झाडांचे नुकसान होते. आता या घटनेनंतर त्याची भरपाई करावी लागेल. जळालेल्या झाडांच्या दुप्पट तिप्पट झाडे लावणे आवश्यक आहे. यासाठी वनविभाग व महापालिकेसह संबंधित यंत्रणेने नियोजन करावे, आम्ही त्यांना हवे ते सहकार्य करण्यास तयार आहोत. तो परिसर पुन्हा हिरवागार करू.
- रवींद्र सिन्हा, सदस्य-भूजल अभिमान, स्वयंसेवी संस्था

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com