'पीएमआरडीए'चे ई-टपाल, फाइल ट्रॅकिंग प्रणाली धूळखात 

सुवर्णा नवले
Monday, 19 October 2020

पीएमआरडीएचा कारभार; फाइल गहाळ होण्याचा गोंधळ, नव्या ई-प्रणालीचा घाट 

पिंपरी : औंध व आकुर्डी या दोन कार्यालयातून पीएमआरडीएचे कामकाज चालते. अनेकदा औंध कार्यालयातच आयुक्त बसत असल्याने सह्यांसाठी फाइल व टपालांची ने-आण दिवसभर सुरू असते. अशा गोंधळात फाइल नेमकी कुठे 'इन' व 'आउट' झाली याचा थांगपत्ताच लागत नाही. शेवटी कागदपत्रे गहाळ झाल्याने नवीन कागदपत्रे पुन्हा तयार करण्याची वेळ अनेक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर आली आहे, यासाठी सहा लाख रुपये खर्चून उभारलेली 'ई-टपाल' व 'फाइल ट्रॅकिंग' प्रणालीच धूळखात पडली असल्याचे समोर आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शासकीय कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) डिजिटलला प्राधान्य दिले आहे. ई-टपाल व फाइल ट्रॅकिंग प्रणाली सुरू केली. पण, 'नव्याचे नऊ दिवस' संपले आणि सॉप्टवेअर धूळ खात पडले. आता पुन्हा नव्या ई-प्रणालीचा घाट घातला जात आहे. तसेच, 2017 मध्ये "प्रियाटेक' कंपनीकडून एक वर्षासाठी ई-प्रणालीचे कंत्राट घेतले. एक वर्ष उलटूनही वापर केला नाही. 2020 पर्यंत प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांना आणि लिपिकांना स्वतंत्र प्रशिक्षण दिले. प्रशासन प्रमुखांना वेळोवळी माहिती दिली. सध्या ई-टपालातील आवक प्रणालीचा वापर सुरू असून जावक प्रणाली बंद आहे. तसेच, आवक-जावकसाठीचे कर्मचारी वारंवार बदलत असल्याने प्रणालीचा वापर प्रभावीपणे होत नसल्याचे दिसून येते. ई-प्रणाली कार्यान्वित नसल्याने पारंपरिक पद्धतीने पुठ्ठ्यांच्या आवरणात टपाल सबमिट केले जाते. या प्रकारात कित्येकदा दस्तऐवज गहाळ होण्याचेही प्रकार घडले आहेत. हे टाळण्यासाठी डिजिटल कामाला प्राधान्य देणे अपेक्षित आहे. 

लोकप्रतिनिधी, ना जनतेचा तगादा 
पीएमआरडीएचा कारभार पूर्णतः प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हातात आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी किंवा जनतेकडून अर्धवट कामांसाठी किंवा एका टेबलावर फाइल किती दिवस पडून राहते? याचा जाब कोणी विचारत नसल्याने प्रशासन बिनधास्त आहे. औंध व आकुर्डी कार्यालयांतील अंतर जास्त असल्याने नागरिकही तसदी घेत नाहीत. त्यामुळे बांधकाम परवानगी, झोन दाखला व इतर दस्ताऐवजांच्या कामकाजासाठी आलेला वर्गच कामाने मेटाकुटीला येतो. यापलीकडे ना जनतेची आंदोलने, ना मागण्या होतात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पीएमआरडीएच्या कामकाजासाठी दुसऱ्या नवीन ई-टपाल प्रणालीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. ही प्रणाली साधी सोपी असल्याने त्याची अंमलबजावणी सुरू आहे. 
- सुहास दिवसे, आयुक्त, पीएमआरडीए 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMRDA does not use e-mail, file tracking system