एकाच व्यासपीठावर राजकीय विरोधकांची मांदियाळी, कुठे घडला हा चमत्कार? वाचा

पीतांबर लोहार
Friday, 28 August 2020

विरोध हा विरोधासाठी असावा विकासासाठी नाही, असे राजकारणाबाबत म्हटले जाते. त्याची प्रचिती शुक्रवारी शहरात आली.

पिंपरी : विरोध हा विरोधासाठी असावा विकासासाठी नाही, असे राजकारणाबाबत म्हटले जाते. त्याची प्रचिती शुक्रवारी शहरात आली. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक चक्क एकाच व्यासपीठावर बघायला मिळाले. यात स्थानिक नेतृत्वासह राज्यातील नेत्यांचाही समावेश होता. 

वाकडमधील रस्त्यांचे विषय फेटाळले; सत्ताधारी भाजपने बदलली भूमिका 

पुणे, पिंपरी-चिंचवडकरांनो! आता मास्क नसल्यास एक हजाराचा दंड 

महापालिकेने ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर येथे कोविड रुग्णालय उभारले आहे. त्याचे उद्‌घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर उषा ढोरे (भाजप), खासदार श्रीरंग बारणे (शिवसेना), भाजपचे शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (भाजप), पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), महापालिका सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

पवार विरुद्ध फडणवीस 

उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काही महिन्यांपूर्वी राज्यात सत्ता स्थापन करताना व राज्यपालांच्या दालनामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना अनेकांनी पाहिले आहे. परंतु, अवघ्या काही तासांत बिनसले आणि पवार यांनी शिवसेनेसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून भाजप नेत्यांनी पवार यांच्यावर अनेकदा टिका केली. 

पवार विरुद्ध पाटील 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर अजित पवार यांनी अनेकदा टीका केली. आक्षेपार्ह शब्द वापरले. पाटील यांनीही पवारांवर वेगवेगळ्या विषयांबाबत अनेकदा आरोप केले. मग, लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. 

बारणे विरुद्ध जगताप 

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे व भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाचा माहिती आहे. गेल्या दहा वर्षांपासून अर्थात 2009 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपासून आजपर्यंत दोघांचेही अजिबात पटले नाही. दोन्ही निवडणुकीत दोघांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. परंतु, आज दोघे शेजारी-शेजारी बसले होते. बराच वेळ एकमेकांत कुजबूच सुरू होती. 

Image may contain: one or more people
आमदार लक्ष्मण जगताप व खासदार श्रीरंग बारणे

जगताप विरुद्ध लांडगे 

भाजपचे माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व विद्यमान शहराध्यक्षपद आमदार महेश लांडगे यांच्यात अनेकदा मतभेद असल्याचे दिसून आले. स्थायी समिती सभेतही दोन्ही आमदारांच्या समर्थक नगरसेवकांनी एकमेकांच्या विरोधात भूमिका घेतली होती. दोघांमधील वादामुळेच आमदार लांडगे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा दोन दिवसांपूर्वी रंगली. परंतु, आजच्या कार्यक्रमात दोघेही शेजारी-शेजारी बसलेले दिसले. 

महापौरांची कानउघडणी अन्‌ कौतुक 

नेहरूनगर येथील जम्बो फॅसिलिटी रुग्णालयाचे उद्‌घाटन दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी महापौर उषा ढोरे यांनी मनोगत व्यक्त केले मात्र, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख केला नव्हता. त्यावरून पवार यांनी खंत व्यक्त करीत, 'यापुढे असे करू नका' अशा शब्दांत कानउघडणी केली होती. आज मात्र, महापौरांनी सर्वच नेत्यांचा नामोल्लेख केला. पवार यांनीही महापौरांचा नामोल्लेख करीत, 'रुग्णालय उभारल्याबद्दल महापौर व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो', अशा शब्दांत कौतुक केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political opponents on the same platform at pimpri chinchwad ajit pawar vs devendra fadnavis ajit Pawar vs chandrakant patil shrirang barne vs laxman jagtap