esakal | रजा रद्द केल्यानंतरही कैदी कारागृहाबाहेरच

बोलून बातमी शोधा

रजा रद्द केल्यानंतरही कैदी कारागृहाबाहेरच

एका गुन्ह्यात अटक करून त्याला येरवडा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान, कोरोना साथीमुळे सुरेश याला १० मे २०२० ला ४५ दिवस आपत्कालीन आकस्मिक अभिवचन रजेवर कारागृहातून सोडण्यात आले.

रजा रद्द केल्यानंतरही कैदी कारागृहाबाहेरच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोना काळात बंदी रजेवर कारागृहातून बाहेर सोडलेल्या कैद्याला काही दिवस रजावाढ देण्यात आली. यादरम्यान कैद्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्याने कारागृहाने त्याची रजावाढ रद्द केली. मात्र, त्यानंतरही कैदी कारागृहात परतलाच नाही. याप्रकरणी कैद्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश विश्‍वनाथ कदम (रा. भारतनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी किशोर शेळकंदे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सुरेश कदम याला एका गुन्ह्यात अटक करून त्याला येरवडा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान, कोरोना साथीमुळे सुरेश याला १० मे २०२० ला ४५ दिवस आपत्कालीन आकस्मिक अभिवचन रजेवर कारागृहातून सोडण्यात आले. बंदी रजेच्या कालावधीत आरोपी सुरेश हा त्याचा मुलगा अविनाश सुरेश कदम याच्याकडे राहणार होता.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवड शहरात ९८ लसीकरण केंद्रे बंद

सुरेश याला वेळोवेळी रजावाढ करून एकूण तीनशे दिवस रजावाढ मंजूर करण्यात आली होती. दरम्यान, त्याच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. त्याने रजा मंजुरी आदेशातील अटी शर्तींचे पालन न केल्याने त्याची रजा वाढ रद्द करून त्याला २१ एप्रिल २०२१ ला येरवडा कारागृहात तातडीने हजर होण्यास सांगण्यात आले. मात्र, तो २१ एप्रिलला कारागृहात हजर झाला नाही. दरम्यान, अनधिकृतपणे कारागृहाबाहेर वास्तव्य करीत असल्याप्रकरणी त्याच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.