
शिष्यवृती परीक्षा आता ३१ जुलै रोजी
पिंपरी : मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या शहरात शाळा पावसामुळे बंद आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मोठा निर्णय घेतला आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीची येत्या बुधवारी (ता.२०) होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली आहे. आता ही परीक्षा ३१ जुलै रोजी होणार आहे. शहरातून ११ हजार ३५५ मुलांनी नोंदणी केली होती.
शिष्यवृत्ती परीक्षा आता ३१ जुलैला
दरवर्षी इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला लाखो विद्यार्थी नोंदणी करतात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने इयत्ता पाचवी आणि आठवीची २० जुलै रोजी राज्यभरात ही परीक्षा होणार होती. मात्र अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाल्याने आणि मुसळधार पाऊस पडत असल्याने वाहतूक बंद आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचायला अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा आता ३१ जुलै रोजी घेतली जाणार आहे. शहरातून ४९ परीक्षा केंद्रातून इयत्ता पाचवीचे ७ हजार ९४ तर आठवीचे ४ हजार २६१ विद्यार्थी परीक्षा ३१ केंद्रातून देणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिली आहेत.
अशी केली होती तयारी
शहरात ८० केंद्रातून शिष्यवृत्ती परीक्षा होणार होती. त्या परीक्षेसाठी ८० केंद्र संचालक, ५७८ पर्यवेक्षक आणि १५५ शिपाई अशी स्टाफची नियोजन केले होते. १५० गुणांची परीक्षा असणार असून आठवीच्या मुलांनी १५ प्रश्नांचे उत्तरांसाठी २ पर्यायांना गोल करायचा आहे, असा बदल यावर्षी करण्यात आल्याचे शिष्यवृत्ती समन्वयक सुभाष सुर्यवंशी यांनी सांगितले.
इयत्ता - विद्यार्थी संख्या - परीक्षा केंद्र
पाचवी - ७ हजार ९४ - ४९
आठवी - ४ हजार २६१ -३१
Web Title: Rain Forcast Scholarship Exam Of Standard 5 And 8 Class Held On 31st July
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..