मावळ तालुक्यात धान्यवाटप बंद करण्याचा रेशन दुकानदारांचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

  • ई-पॉस मशिनला शिधा कार्डधारकांचे अंगठे घेऊन धान्य वाटपाच्या निर्णयाला विरोध 

वडगाव मावळ (पुणे) : सरकारने ई-पॉस मशिनला शिधा कार्डधारकांचे अंगठे घेऊन धान्य वाटप करण्याचा आदेश दिल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. सरकारच्या या आदेशाच्या निषेधार्थ मावळ तालुका स्वस्त धान्य व किरकोळ केरोसीन दुकानदार संघटनेने ऑक्‍टोबर महिन्यापासून धान्य वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे म्हणतायेत, 'कोरोनाविरुद्धची लढाई नक्की जिंकू' 

संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल नालबंद, सचिव चंद्रजित वाघमारे, कार्याध्यक्ष अंकुश आंबेकर, अशोक होगले, लहू सावळे, संजय रौंधळ, दत्तात्रेय घोजगे, संगीता गोपाळे, दत्तात्रेय केदारी, विजय आडकर आदी पदाधिकाऱ्यांनी या बाबत तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन दिले आहे. सरकारने एक ऑगष्ट 2020 पासून ई-पॉस मशिनला कार्डधारकांचे अंगठे घेऊन धान्यवाटप करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे कार्डधारक व दुकानदार यांच्यात सोशल डिस्टन्सिंग राहणार नाही. मशिनवर एकाच वेळी 40-50 कार्डधारकांचे अंगठे घेतल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढेल. अगोदरच कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. अठरा स्वस्त धान्य दुकानदारांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हा धोका लक्षात घेऊन पूर्वीप्रमाणेच दुकानदारांचेच अंगठे अधिप्रमाणित करून धान्य वाटपाला परवानगी द्यावी. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दुकानदार व त्यांच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपयांचे विमा संरक्षण द्यावे, आदी मागण्या संघटनेने शासनाकडे केल्या होत्या. मात्र, त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे संघटनेने न्यायालयातही याचिका दाखल केली होती. न्यायालयाने कार्डधारकांचे अंगठे घेण्याच्या आदेशाला स्थगिती दिली होती. सरकारने न्यायालयाचा हा आदेशही मानला नाही. सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी संघटनेने ऑक्‍टोबरपासून धान्य उतरवून न घेण्याचा व वाटप न करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार जोपर्यंत कार्डधारकांचे अंगठे घेण्याचा आदेश मागे घेत नाही, तोपर्यंत दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. 

मावळ तालुक्‍यातील स्थिती 

  • केशरी कार्डधारक : 37,000 
  • पिवळे कार्डधारक : 4, 500 
  • दुकानदार संख्या : 186 
  • पॉस मशिन संख्या : 172 
  • कोरोना संसर्ग झालेले दुकानदार : 18 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्याच्या अन्न पुरवठामंत्र्यांनी यापूर्वी सांगितले होते की, राज्यातील आठ कोटी जनता लॉकडाउनमध्ये घरात बसलेली असताना दुकानदारांनी जनतेला धान्यवाटप केले. त्याबद्दल त्यांनी दुकानदारांना कोरोना योद्धा म्हणून उपाधी दिली. दुकानदार व त्यांच्या कुटुंबांना 50 लाखांचे विमा संरक्षण देण्याचेही जाहीर केले. त्यानंतर मात्र नकार दिला. सरकारच्या या धोरणाचा आम्ही निषेध करतो. 
- बाबूलाल नालबंद, अध्यक्ष, मावळ तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ration shopkeepers will stop distribution of foodgrains in maval taluka