दहा शैक्षणिक संस्थांनी थकवले भाडे

दहा शैक्षणिक संस्थांनी थकवले भाडे

पिंपरी - महापालिका मालकीच्या इमारतींमध्ये शाळा भरविणाऱ्या आणि लाखो रुपयांचे शुल्क उकळणाऱ्या दहा शैक्षणिक संस्थांनी महापालिकेची तब्बल आठ कोटी रुपयांची भाडे रक्कम थकवली आहे. काहींनी शाळा बंद करून पलायन केले आहे, तर काहींनी महापालिकेलाच न्यायालयात खेचले आहे. आता ही थकबाकी वसूल करताना भूमी व जिंदगी विभागाच्या नाकीनऊ आले आहे. एकूणच, वसुली पथकांतील अधिकाऱ्यांवर हातावर हात ठेवून बसण्याची नामुष्की ओढवली आहे.

या इमारती नाममात्र भाड्याने १७ शाळा-संस्था अत्यल्प वार्षिक भाडे करारावर वापरत आहेत. ११ महिने ते ३० वर्षांपर्यंत ताबा मिळविलेल्या या खासगी संस्थांनी २०१६ ते २०२० पाच वर्षात कोट्यवधी रुपये थकविले आहेत. त्यात काही संस्थांना केवळ ४०० रुपयांपासून जास्तीत जास्त १० हजार रुपये भाडे आकारले जाते. लाखो रुपयांचे शुल्क उकळणाऱ्या या शाळा-संस्थाचालकांकडून नाममात्र भाडेदेखील भरत नाहीत. आता अनेक वर्षाची वसुली करण्याचे संकट महापालिका प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. दुसरीकडे डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानने अवाजवी वा जादा भाडे आकारणी केल्याची तक्रार करत महापालिकेला न्यायालयात खेचले आहे. त्यानंतर तीच इमारत डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या नावाने नवा करारनामा केला आहे. अजमेरा कॉलनीतील तांत्रिक शाळा सध्या मोफत चालवायला दिल्याने लाखो रुपये बुडत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रजिस्टर करारनामे करा 
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने लेखाविभागाचे परीक्षण सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत कोट्यवधी आठ कोटी रुपये येणे आहे. परिणामी यापुढे रजिस्टर करारनामे करावेत, असा निरीक्षण नोंदवले आहे. त्यानुसार सगळ्या शैक्षणिक संस्थांना दोनवेळा नोटिसा बजावल्या आहेत. थकबाकी असलेल्या संस्थांकडून दंडासहित रक्कम वसूल करण्याचा शेरा दिला आहे. 

थकबाकीसह संस्था चालकांचे पलायन 
भोसरीतील रंगदास स्वामी शिक्षण मंडळाने करारनामा न करता २००६ पासून शाळेची इमारत ताब्यात घेतली होती. कासारवाडीतील प्राथमिक उर्दू शाळेची इमारत पाच वर्षासाठी जाफरिया एज्युकेशन ट्रस्टने २०११मध्ये घेतली होती. नवनगर शिक्षण मंडळ, ब्रम्हदत्त विद्यालय आणि उर्दू कौन्सिल संस्थेकडे लाखो रुपयांची थकबाकी वसुली करण्यास प्रशासनाला अपयश आले असून आता या शाळा बंद झाल्याने ही वसुली कशी करणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

थकबाकीदार
शैक्षणिक संस्था / थकबाकी 
-डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान, संत तुकारामनगर / ४ कोटी ५६ लाख ४६ हजार ५०९ 
- नॉव्हेल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च, निगडी / २ कोटी ५६ लाख ९३ हजार ४६६ 
-इंदिरा गांधी इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपरी / ३३ लाख 
-जाफरिया एज्युकेशन ट्रस्ट, कासारवाडी / २० लाख ५ हजार ८७० 
-रंगदास स्वामी शिक्षण मंडळ, भोसरी / १३ लाख ७१ हजार ९०० 
-अखिल भारतीय जैन संघटना, संत तुकारामनगर / ६ लाख ६१ हजार 
-ब्रम्हदत्त विद्यालय, निगडी/ ५ लाख २९ हजार ३९१ 
-नवनगर शिक्षण मंडळ, आकुर्डी / २ लाख ४९ हजार 
-कीर्ती विद्यालय (तळमजला), प्राधिकरण / २ लाख २९ हजार 
- उर्दू कौन्सिल, खराळवाडी / २ लाख 

संस्थाचालकांकडील थकबाकी वसूल करण्याला महापालिकेचे प्राधान्य आहे. ज्यांच्याकडे भाडे थकले आहे, अशांना नोटिसा देऊन कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे ती वसूल होईल. तरीही थकबाकी न भरणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 
- मुकेश कोळप, प्रशासन अधिकारी भूमी व जिंदगी विभाग, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com