तळेगावात कोरोनाबाधिताच्या नातेवाइकांची लूट; रुग्णवाहिका चालकांकडून मनमानीपणा

गणेश बोरुडे
Saturday, 5 September 2020

तळेगावात शासकीय अथवा सेवाभावी संस्थेची शववाहिनी उपलब्ध होत नसल्याने कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांची हेंडसाळ होत आहे. तसेच अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी नातेवाइकांसह आरोग्य सेवकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. मृतदेह नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिका चालकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारून पैशांची लूट केली जात आहे.

तळेगाव स्टेशन - तळेगावात शासकीय अथवा सेवाभावी संस्थेची शववाहिनी उपलब्ध होत नसल्याने कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांची हेंडसाळ होत आहे. तसेच अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी नातेवाइकांसह आरोग्य सेवकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. मृतदेह नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिका चालकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारून पैशांची लूट केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मावळातील कोरोनाबाधितांची संख्येने दोन हजारांचा टप्पा पार केला असून, 80 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश कोविड हॉस्पिटल तळेगाव आणि सोमाटणे फाटा परिसरात आहेत. मावळातील एकमेव तळेगावातील बनेश्वर स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार केले जातात. रुग्णवाहिकेत मृतदेह नेणे वैद्यकीय दृष्टीने धोकादायक आहे. मात्र, तळेगाव शहर परिसरात नगर परिषद अथवा कोणत्याही सेवाभावी संस्थेची शववाहिनी अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे थेट लोणावळा येथील सत्यनारायण चॅरिटेबल ट्रस्टची शववाहिनी बोलवावी लागते. त्यासाठी किमान एक तास तरी जातो. तोपर्यंत स्मशानभूमीतील आरोग्य सेवकांसह रुग्णांच्या नातेवाइकांना ताटकळत थांबावे लागते अथवा मृतदेह शवागारात ठेवावा लागतो. 

मावळात आज 26 नवे पॉझिटिव्ह, तर तळेगावात एकूण रुग्णांचा आकडा सर्वाधिक

रुग्णवाहिका चालकांचा मनमानीपणा 
सोमाटणे अथवा तळेगाव स्टेशनच्या कोविड हॉस्पिटलमधून मृतदेह नेण्यासाठी अवघ्या दोन-तीन किलोमीटरसाठी मनमानी पद्धतीने दोन ते तीन हजार रुपये आकारतात. गॅस शवदाहिनीत अगोदरचा मृतदेह जळत असल्यास प्रतीक्षा करावी लागल्यास तासाला किमान पाचशे रुपये हॉल्टिंग चार्ज मृताच्या नातेवाइकांना आकारला जातो. मध्यंतरी एका मृतदेहाला रात्रभर ठेवण्यासाठी एका रुग्णवाहिका चालकाने संबंधित नातेवाइकांकडून तब्बल सहा हजार रुपये उकळल्याचे समजते. कोरोना रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठीही खासगी रुग्णवाहिकाचालक मनमानी पद्धतीने पैसे आकारत आहेत. पैशांवरून आपत्कालीन प्रसंगी रुग्णांना सेवा नाकारण्याचे प्रकारही घडत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्यादृष्टीने मृतदेह आणि नातेवाइकांची हेळसांड थांबविण्यासाठी मावळ तालुका आरोग्य विभाग अथवा तळेगाव दाभाडे नगरपरिषद आरोग्य विभागाने किमान एक शववाहिनी युद्धपातळीवर उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी आहे. 

जम्बो रुग्णालयांची पिंपरी महापौरांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना केल्या सूचना
 
सत्यनारायण मंदिर ट्रस्टची निष्काम सेवा 
लोणावळा येथील सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कोरोना महामारीच्या काळात रुग्णालयातून कॉल येताच तत्परतेने कोणतेही शुल्क न आकारता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांसाठी विनामूल्य शववाहिनी उपलब्ध करून दिली जात आहे. चालकास पीपीई कीट तळेगाव नगर परिषदेकडून उपलब्ध करून देण्यात येते. ट्रस्टच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा ठपका

'कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र शववाहिनी उपलब्ध करून देण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याशी बोलून प्रयत्न करणार आहे.'' 
- डॉ. चंद्रकांत लोहारे, आरोग्य अधिकारी 

"कोरोना रुग्णांना रुग्णालयात पोचवण्यासाठी रुग्णवाहिका आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा अंत्यविधी करण्यासाठी शववाहिनी वेळेत उपलब्ध न झाल्याने रुग्णांसह नातेवाइकांचे हाल होत आहेत. प्रशासनाने रुग्णवाहिका आणि शववाहिनी उपलब्ध करून द्यावी अथवा रुग्णांना लुटणाऱ्या खासगी रुग्णवाहिकांना दर ठरवून द्यावेत. जेणेकरून सामान्यांची लूट थांबेल.'' 
- कोरोना रुग्णाचा नातेवाईक

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery of relatives of coroners in Talegaon Arbitrariness by ambulance drivers