esakal | मराठा आरक्षणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये 'संबळ बजाव' 
sakal

बोलून बातमी शोधा

मराठा आरक्षणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये 'संबळ बजाव' 
  • खासदार व तीन आमदारांच्या कार्यालयांसमोर आंदोलन 

मराठा आरक्षणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये 'संबळ बजाव' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गळ्यात भगवे उपरणे, हातात भगवे झेंडे आणि पारंपरिक संबळ वादन अशा वातावरणात मराठा आरक्षण स्थगिती उठविण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (ता. 15) खासदार व आमदारांच्या कार्यालयांसमोर संबळ बजाव आंदोलन करण्यात आले. यात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा मराठा युवा महासंघ व मराठा क्रांती मोर्चा या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या थेरगावातील कार्यालयापासून आंदोलनाला सुरुवात झाली. सुमारे दहा मिनिटे संबळ वादन करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मण जगताप यांचे पिंपळे गुरव येथील कार्यालय आणि भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे यांच्या भोसरीतील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या चिंचवड स्टेशन येथील कार्यालयासमोर आंदोलनाचा समारोप झाला. केंद्र व राज्य सरकारांनी मागण्या मान्य करण्यात चालढकल केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, माजी नगरसेवक मारुती भापकर, संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे, उपाध्यक्ष सतीश काळे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, संघटक ज्ञानेश्‍वर लोभे, मराठा छावा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, लहू लांडगे, रशीद सय्यद, सतीश कदम, गणेश सरकटे, सागर तापकीर, अभिषेक म्हसे, दीपक जोगदंड, गणेश भांडवलकर, कृष्णा मोरे आदी उपस्थित होते. 

आंदोलकांच्या मागण्या 
- केंद्र व राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावेत 
- सर्वपक्षीय नेत्यांनी मतभेद टाळून राजकारण न करता न्याय मिळवून द्यावा 
- मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी घटना दुरुस्ती करून कायदेशीर अडथळे दूर करावेत 
 

loading image