अजितदादा ‘विकासपुरुष’

Sanjog-Waghere-with-Ajit-Pawar
Sanjog-Waghere-with-Ajit-Pawar

पिंपरी-चिंचवड शहराचा जो काही कायापालट झाला आहे. तो केवळ आदरणीय अजितदादांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे झाला आहे. अजितदादा म्हणजे विकासपुरुष आहेत. पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी राज्य किंवा केंद्र सरकारचा निधी कसा मिळेल यासाठी दादांचा सातत्याने प्रयत्न असतो. प्रत्येक नगरसेवक, नगरसेविकांना मग तो कोणत्याही पक्षाचा असो, दादा पक्षभेद बाजूला ठेवून विरोधकांनाही सहकार्य करण्याची भूमिका घेतात. हे मी गेल्या अनेक वर्षांपासून बघतो आहे. त्यामुळेच पिंपरी-चिंचवड हे स्मार्ट सिटी म्हणून नावारूपाला आले आहे. जे सांगेल तेच करणार. एकदा शब्द दिल्यावर तो शेवटपर्यंत पूर्ण करणारच, हा त्यांचा स्वभाव मला विशेष भावतो. कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम त्यांनी केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी वाघेरे ही ग्रामपंचायत असल्यापासून माझे वडील भिकू वाघेरे पाटील ऊर्फ अप्पा हे राजकारणात होते. त्यामुळे तेव्हापासूनच त्यांचा शरद पवारसाहेबांशी तसेच इतर राजकीय नेत्यांशी संबंध होता. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापन झाल्यानंतर अप्पा शहराचे महापौर असताना त्यांचे अचानक निधन झाले. तरुण वयातच माझा राजकारणात प्रवेश झाल्यानंतर पवार कुटुंबीयांशी आमचे संबंध अधिक दृढ होत गेले. पिंपरी-चिंचवड हे बारामती लोकसभा मतदारसंघात येत असल्याने लोकसभेच्या 1991 च्या निवडणुकीच्यावेळी या मतदारसंघाच्या उमेदवारीमुळे आमचा अजितदादांशी जवळचा संबंध आला. या तरुण नेतृत्वाचे आम्हा तरुण कार्यकर्त्यांना आकर्षण होते. त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांनी दादांबरोबर पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार प्रचार केला. यावेळी एक स्पष्ट बोलणारा नेता, अशी आम्हाला दादांची ओळख झाली. खासदार म्हणून दादा लोकसभेवर गेले.

परंतु, काही महिन्यातच ते पुन्हा राज्याच्या राजकारणात आले. तेव्हा त्यांनी पिंपरी-चिंचवडच्या कारभारात लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यावेळी कॉंग्रेस नेते प्रा. रामकृष्ण मोरे आणि दादा हे दोघे मिळून महापालिकेबाबत निर्णय घेत. मात्र, नंतर या मतदारसंघाचे आमदार व राज्याचे मंत्री या नात्याने दादांनी पिंपरी-चिंचवडवर अधिक लक्ष केंद्रित केले. या शहराच्या विकासाला चांगली दिशा देण्याचे दादांच्या मनात होते. पिंपरी-चिंचवड शहराची देशात आगळी-वेगळी ओळख व्हावी, असे त्यांना वाटत होते. त्यादृष्टीने सुरुवातीपासूनच त्यांनी आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करायला सुरुवात केली. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना त्यांच्याशी संबंध वाढला. तेव्हापासून आम्ही दादांबरोबर होतो आणि अजूनही त्यांच्याबरोबर आहोत. 

1995-96 ला महापौरपदाच्या निवडणुकीच्या वेळी मी महापौरपदासाठी इच्छुक होतो. एक तरुण नेतृत्व या शहराला द्यावे, असे दादांच्या मनात होते. त्यांच्या नेतृत्वामुळे महापौरपदाची माळ माझ्या गळ्यात पडली. त्यामुळे महापौर म्हणून दादांशी थेट संबंध येऊ लागला. त्यांच्या प्रोत्साहनामुळे काम करायला आनंद मिळू लागला. लोकांना उपयोगी पडेल असे काम करा, असे दादा नेहमी सांगतात. मी महापौर असताना या शहरातील खेळाडूंना चांगली संधी मिळावी, या दृष्टीने काहीतरी करायला पाहिजे, असे दादांच्या मनात होते. पिंपरी-चिंचवड शहराची ओळख ही केवळ कामगारनगरी म्हणून न होता क्रीडा व सांस्कृतिक नगरीही व्हावी, असे माझ्याप्रमाणेच त्यांनाही वाटत होते. त्यावेळी आम्ही महानगर क्रीडा विभागासाठी पाच कोटी रुपये फिक्‍स डिपॉझिट ठेवून त्याच्या व्याजातून महापौर चषक स्पर्धा सुरू केल्या. त्यात कबड्डी, खो-खो, कुस्ती अशा विविध महापौर चषक क्रीडा स्पर्धा होऊ लागल्या. त्याला चांगला प्रतिसादही मिळू लागला. काका पवारसारख्या मल्लाला महापालिकेत नोकरीची संधी दिली. 

विशेष म्हणजे शहरातील खेळाडूंना सराव करता यावा. तसेच क्रीडा स्पर्धा घेता याव्यात यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे असलेले अण्णासाहेब मगर स्टेडिअम व जलतरण तलाव देखभाल व विकासासाठी महापालिकेच्या ताब्यात घेण्याचे महत्त्वाचे काम अजितदादांनी केले. त्यानंतर क्रीडा विभागही तेथे स्थलांतरित करण्यात आला. दादांच्या दूरदृष्टीमुळे या बदलाचा खेळाडूंना खूपच फायदा होऊ लागला. 

भक्ती-शक्ती उद्यान, शहरातील पुणे-मुंबई रस्ता रुंदीकरण, रेल्वे उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, आचार्य अत्रे सभागृह, उद्यानांचा विकास आदी योजना प्रत्यक्षात आणल्या. प्रा. रामकृष्ण मोरे यांची आठवण या शहराला राहावी, यासाठी चिंचवडच्या प्रेक्षागृहाला प्रा. रामकृष्ण मोरे यांचे नाव देण्यात आले. पिंपरीमध्ये जलतरण तलाव, समाज मंदिराचे नूतनीकरण, छत्रपती शिवाजी महाराजांचा आसनाधिष्टीत पुतळा आदी कामेही सहजपणे पूर्णत्वाला आली. त्याचबरोबर केंद्राच्या जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा निधी दादांच्या नेतृत्वामुळे महापालिकेला मिळाला. या निधीमुळे पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विकास झाला.

दादांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो प्रकल्पाचेही काम वेगाने सुरू आहे. अशा पद्धतीने या शहरात दादांच्या नेतृत्वाखाली कामगार, क्रीडा, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, उद्योग क्षेत्र तसेच महिलांसाठीही योजना राबविण्यात येऊ लागल्या. महिलांना घरगुती व्यवसाय सुरू करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून पंधरा ते वीस हजार रुपये बिनव्याजी कर्ज योजना, शिवणयंत्र वाटप, कार ड्रायव्हिंग तसेच संगणक प्रशिक्षणाचे विविध कोर्स सुरू केले. त्यामुळे महिलांना प्रोत्साहन मिळू लागले. दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही असे नवनवीन उपक्रम सुरू केले. अपंग, बधिर-मूक अशा विशेष मुलांना मदत होईल, अशा पद्धतीने सायकल, श्रवणयंत्र वाटप आदी योजना राबविल्या. 

माझा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्यावर दादांनी माझी पत्नी उषा हिला येथून उमेदवारी दिली. ती विजयी झाल्यानंतर तिलाही 2008 मध्ये स्थायी समितीचे अध्यक्षपद देऊन दादांनी शहर विकासासाठी काम करण्याची मोठी संधी दिली. यातून दादांचा महिलांविषयीचा पुरोगामी दृष्टिकोन दिसून आला. तिच्या कारकिर्दीमध्येही अनेक विकासकामे झाली. त्यातील नाशिक फाटा येथे उभारण्यात आलेल्या दुमजली उड्डाणपुलाचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्याला भारतरत्न जेआरडी टाटा यांचे नाव देण्यात आले. 

माझे वडील भिकू वाघेरे पाटील यांच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानलाही दादा सतत मार्गदर्शन करत असतात. आपण समाजाला देण लागतो. त्या पद्धतीने उपक्रम राबवले गेले पाहिजेत. त्यानुसार प्रतिवर्षी क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. तसेच न चुकता रक्तदान शिबिर आयोजित करतो. यंदाही लॉकडाउनच्या काळात घेतलेल्या शिबिरात 105 जणांनी रक्तदान केले. अजितदादांनी केलेल्या सूचनेनुसार शहराच्या विकासासाठी तसेच समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तीचा पिंपरी-चिंचवड भूषण पुरस्काराने गौरव केला जातो. प्रतिष्ठानच्या कार्यक्रमांना एक उंची प्राप्त झाली असून, शरद पवारसाहेब, अजितदादा तसेच राजकीय, सामाजिक आणि अन्य क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थिती लावली आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com