Sant Dnyaneshwar Srusti : वडमुखवाडीत साकारतेय ‘संत ज्ञानेश्वर सृष्टी’ Sant Dnyaneshwar Srusti Preparation work started in vadmukhwadi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sant Dnyaneshwar Maharaj

Sant Dnyaneshwar Srusti : वडमुखवाडीत साकारतेय ‘संत ज्ञानेश्वर सृष्टी’

भोसरी - चऱ्होलीतील वडमुखवाडीत संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारित समूहशिल्पाच्या परिसरात ‘संत ज्ञानेश्वर सृष्टी’ तयार करण्याचे काम सुरू आहे. येथे विविध संतांच्या जीवनावर आधारित एकूण ४७ ‘म्युरल्स’ बसविण्यात येणार आहेत.

वडमुखवाडीत संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराजवळील संत ज्ञानेश्वर सृष्टी साकारण्यात येत आहे. सध्या येथे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारित शिल्प उभारण्यात आले आहे. ‘ब्रांझ म्युरल्स’साठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सहा कोटी एक लाख रुपये तर स्थापत्य विषयक कामासाठी सहा कोटी ४५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. या शिल्पांना संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची मान्यता घेण्यात आली आहे. ही ‘म्युरल्स’ व शिल्पांना महाराष्ट्र राज्य कला संचालनालय यांच्याकडून मान्यता मिळवून तयार करण्यात येत आहेत.

संतांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग

‘म्युरल्स’जवळ त्या प्रसंगांची माहिती देणारे फलकही लावले जाणार आहेत. त्यामुळे भाविक, नागरिकांना संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाची माहिती मिळणार आहे. येथे संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज पालखी चाले पंढरी, नामदेव औंढा नागनाथ मंदिरातील कीर्तन, तीर्थावली नामदेव-ज्ञानेश्वर विहिरीतील पाणी पिण्याचा प्रसंग, संत ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लेखन, निवृत्तिनाथांना त्र्यंबकेश्वर येथील पर्वतातील गुहेत गहिनीनाथ उपदेश करताना, संत नरहरी सोनार, संत एकनाथ, संत निळोबा, संत तुकाराम महाराज यांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत चोखामेळा, भक्त पुंडलिक, चंद्रभागा नदी, पुंडलिक आई-वडिलांची सेवा, ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजणे, ज्ञानेश्वर-निवृत्ती गुरू शिष्य, मुंगी उडाली आकाशी मुक्ताबाई, नामयाची खीर, नामदेव पायरी-पंढरपूर, संत सावता माळी, विठू माझा लेकुरवाळा, संत एकनाथ महाराज, दार उघड बया,

संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज भेट, चांगदेव महाराज गर्वहरण, संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदविले, संत दामाजी पंत, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी प्रसंग, ज्ञानेश्वर महाराजांची गवळण, नामदेव कीर्तन करी, संत कान्होपात्रा प्रसंग, संत नरहरी सोनार, संत तुकाराम अभंग, अध्याय पहिला-अर्जुन विषादयोग, अध्याय दुसरा-सांख्ययोग, अध्याय तिसरा-कर्मयोग, अध्याय चौथा- ज्ञानसंन्यासयोग, अध्याय पाचवा- योगगर्भयोग, अध्याय सहावा-आत्मसंयमयोग, अध्याय सातवा-विज्ञान योग, अध्याय आठवा-ब्रम्हक्षरनिर्देशयोग, अध्याय नववा-राजविद्या राजगृह्ययोग, अध्याय दहावा-विभूतियोग, अध्याय अकरावा-विश्वरुपदर्शन योग, अध्याय बारावा-भक्तियोग आदी ‘म्युरल्स’ लावण्यात येणार आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावरील प्रसंग

  • संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद वदविले

  • संत ज्ञानेश्वर महाराजांनी निर्जीव भिंत चालविली म्हणजेच चांगदेव महाराज गर्वहरण प्रसंग

  • संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मांडे भाजतानाचा प्रसंग

  • संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचा प्रसंग

  • संत तुकाराम महाराज यांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज उपस्थित असल्याचा प्रसंग

‘म्युरल्स’चे काम येत्या चार महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. मात्र, आषाढी वारीपूर्वी या ठिकाणी तीन ‘म्युरल्स’ लावण्यात येणार आहेत. यामध्ये ४० फूट लांब व सात फूट रुंदीचे पालखी सोहळ्याचे शिल्प आहे. त्याप्रमाणे ‘संत गोरा कुंभार’ व ‘संत जनाबाई’ यांच्या जीवनावरील दोन शिल्पांचा समावेश आहे.

- महेंद्र थोपटे, शिल्पकार

वडमुखवाडीतील संत ज्ञानेश्वर सृष्टीमधील संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीच्या शिल्पाचे लोकार्पण आषाढी वारीपूर्वी होणार आहे. या ठिकाणी स्थापत्य विभागाद्वारे ॲम्फी थिएटरसह विविध कामे सुरू आहेत.

- संजय घुबे, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय