esakal | लस वाचवा, कोरोनापासून वाचा

बोलून बातमी शोधा

लस वाचवा, कोरोनापासून वाचा
लस वाचवा, कोरोनापासून वाचा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोना प्रतिबंधक लस शहरातील नागरिकांना दिली जात आहे. त्यासाठी महापालिकेने स्वतःचे व खासगी संस्थांमार्फत लसीकरण केंद्र उभारले आहेत. काही केंद्रांवर लशीचा तुटवडा आहे, तर काही केंद्रांवर लस वाया जात आहे. तांत्रिक व शास्त्रीय कारणांमुळे गेल्या दोन दिवसांत तब्बल ३३ हजार ९०० डोस वाया गेले आहेत.

शहरात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. महापालिकेच्या ६० व खासगी १८ अशा ७८ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. लशीचा तुटवडा असल्याने काही केंद्रे बंद करावी लागली होती. आठ दिवसांपूर्वी साठा संपल्याने एक दिवस लसीकरण होऊ शकले नव्हते. आता पुरेसा साठा आहे. मात्र, लसीकरणाची वेळ संपण्यावेळी एका व्हायलमधील (बाटली) संपूर्ण दहा डोस न दिले गेल्यास ते वाया जात आहेत. महापालिकेला लसीकरणासाठी आजपर्यंत पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे ‘कोव्हिशील्ड’ व भारत बायोटेकचे ‘कोव्हॅक्सिन’ मिळाले आहेत.

हेही वाचा: पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णांसाठी २२ टन ऑक्सिजन

लसीकरणासाठी आवाहन

दरम्यान, कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेतर्फे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांशी आयुक्त राजेश पाटील यांनी ऑनलाइन संवादही साधला आहे. मार्गदर्शक सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच, आतापर्यंत ६० वर्षांवरील नागरिक व ४५ वर्षांवरील अतिजोखमेची व्याधी असलेल्या नागरिकांचे आणि आरोग्य, वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचे (फ्रंटलाइन वर्कर) लसीकरण केलेले आहे. सध्या ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर मोफत लसीकरण करण्यात येत असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.

यामुळे वाया जाते लस

एका व्हायलमध्ये (बाटली) दहा डोस असतात. लसीकरणाची वेळ संपण्याच्या वेळी पाचपेक्षा अधिक नागरिक लस घेण्यासाठी आले असतील, तर त्यांना परत पाठविणे योग्य होत नसल्याने लस दिली जाते. त्यासाठी व्हायल उघडावी लागते. एकदा व्हायल उघडल्यानंतर सर्व डोस लगेच वापरावे लागतात. मात्र, पाच किंवा सहाच जण असतील, तर तितकेच डोस दिले जातात. परिणामी पाच किंवा चार डोस वाया जातात. याशिवाय, डोसच्या व्हायलचे तापमानही व्यवस्थित मेंटेन करावे लागते. त्यासाठी शीतसाखळी व्यवस्थित आहे. सगळीकडे तापमान डेटा लॉगर आहेत. इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सिन इंटेलिजन्स मॉनिटरिंग सिस्टीम आहे, असे महापालिका महिला वैद्यकीय अधिकारी व लसीकरण प्रमुख डॉ. वर्षा डांगे यांनी सांगितले.

हेही वाचा: पिंपरी : गर्दी, गर्दी आणि फक्त गर्दीच!

असे वाचवू लसीचे डोस

लसीकरण वेळ संपण्यावेळी किमान पाच नागरिक आल्यास त्यांना लस देण्यासाठी व्हायल उघडावी लागते व उर्वरित डोस वाया जातात. ते वाचविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. उदाहरणार्थ, लसीकरण केंद्रांतील अंतर साधारण तीन ते पाच किलोमीटर आहे. वेळ संपल्याच्या वेळी समजा, ‘अ’ केंद्रावर पाच, ‘ब’ केंद्रावर तीन व ‘क’ केंद्रावर दोन नागरिक आहेत. ‘अ’ केंद्रावर पाच नागरिक असल्याने व्हायल उघडावी लागेल. पण, तेथील पाच डोस वाया जातील. अशा वेळी नजीकच्या ‘ब’ व ‘क’ केंद्रांशी संपर्क साधून तेथील अनुक्रमे तीन व दोन अशा पाच किंवा जे उपस्थित आहेत, त्यांना ‘अ’ केंद्रावर पाठवून तेथील सर्व डोस वापरता येतील. यामुळे वाया जाणाऱ्या डोसची संख्या कमी होईल व अधिकाधिक नागरिकांना लस मिळेल.