अडचणीच्या काळात आसरा दिला अन् त्यानेच घात केला 

मंगेश पांडे
Sunday, 13 September 2020

  • निगडीत कोयत्याच्या धाकाने नोकराने लुटला अडीच लाखांचा ऐवज 

पिंपरी : निगडी, यमुनानगर येथील 32 वर्षीय स्मिता रमेश औताडे. तीन चिमुकल्यांसह घरात असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास दरवाजा खटखटला. दरवाजाच्या दुर्बिणीतून पाहिले असता कुटुंबातील सदस्याप्रमाणे असलेला नोकर नजरेस पडला. नेहमीप्रमाणे दूध देण्यासाठी तो आला असावा, या विश्‍वासाने त्यांनी दरवाजा उघडला. मात्र, दूध देण्याच्या बहाण्याने आणखी दोन साथीदारांना सोबत घेऊन आलेला नोकर कोयत्याचा धाक दाखवून घरात शिरला. स्मिता यांच्यासह चिमुकल्यांना दोरीने बांधून सव्वा दोन लाखांचा ऐवज लुबाडला. लॉकडाउनमुळे गावी जाण्याच्या व्यवस्था नसल्याने सहा महिने ज्याचा कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळ केला, घासातला घास दिला. त्यानेच घात केल्याचा प्रकार निगडी येथे उघडकीस आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

किरण बोरा (वय 25) असे आरोपीचे नाव. निगडी, यमुनानगर येथील सेक्‍टर क्रमांक 21 मधील जीवनधारा हौसिंग सोसायटीत औताडे कुटुंबीय राहते. त्यांचे दुर्गानगर चौकात एक हॉटेल होते. या हॉटेलवर आरोपी किरण हा नोकर म्हणून कामाला होता. मात्र, लॉकडाउनमुळे हॉटेल बंद झाल्याने किरणला त्याच्या मूळ गावी नेपाळला परत जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था नसल्याने औताडे यांनी त्यांच्या घराजवळची त्यांची रिकामी खोली किरणला दिली. रोज जेवण देण्यासह आठ दिवसांपूर्वीच त्याला नवीन कपडेही खरेदी केले. कुटुंबातील सर्वांच्याच तो परिचित होता. दररोज सकाळी लवकर दूध आणून देण्याचेही काम त्याच्याकडे होते. 

पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा लॉकडाउन?

दरम्यान, औताडे कुटुंबीय मूळचे भूम, उस्मानाबाद येथील असून, रमेश औताडे शुक्रवारी त्यांच्या वडिलांसह गावी गेले. घरात स्मिता, त्यांची दोन मुले व एक मुलगी होती. या बाबत किरणला माहीत होते. दरम्यान, शनिवारी (ता.12) पहाटे साडेपाचच्या सुमारास किरण दूध देण्याच्या बहाण्याने औताडे यांच्या घरी आला. कोयत्याचा धाक दाखवून तो व त्याचे साथीदार घरात शिरले. स्मिता यांना कोयत्याने मारहाण करीत त्यांच्यासह त्यांच्या मुलांचे हातपाय बांधले. आरडाओरड होऊ लागल्याने त्यांच्या तोंडाला चिकटटेप लावला. त्यानंतर तिजोरीतील सोन्याचे मंगळसूत्र, तीन अंगठ्या, महागडे घड्याळ असा दोन लाख 25 हजारांचा ऐवज त्यांनी लुबाडला. 

...अन्‌ तो बहिणीच्या जिवावर उठला 
रक्षाबंधनला स्मिता यांनी किरणला राखी बांधली होती. या बहीण भावाच्या नात्यालाही तो जागला नाही. रक्ताचे नसले तरी मानलेल्या बहिणीच्या व तिच्या कुटुंबाच्या जिवावरच तो उठला. दरम्यान, रमेश औताडे यांनी ऑनलाइनद्वारे पैसे पाठवून त्याच्या नातेवाईकांनाही आर्थिक मदतही केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a servant looted 2.5 lakh with the help of a scythe in nigadi