हिंजवडीतील 'हा' चौक आयटीयन्सची डोकेदुखी वाढविणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

लॉकडाउनमध्ये हळूहळू शिथिलता येऊ लागली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हिंजवडी आयटी पार्कमधल्या कंपन्या पुन्हा सुरू होतील. आयटीयन्सची ये-जा वाढेल.

पिंपरी : लॉकडाउनमध्ये हळूहळू शिथिलता येऊ लागली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हिंजवडी आयटी पार्कमधल्या कंपन्या पुन्हा सुरू होतील. आयटीयन्सची ये-जा वाढेल. त्यामुळे उद्योग चक्राला गती मिळणार असली, तरी इथला मुख्य चौक म्हणून ओळख असणाऱ्या शिवाजी चौकात मेट्रोने सुरू केलेल्या कामामुळे हा रस्ता आयटीयन्ससाठी त्रासदायक ठरणार असल्याचे समोर आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या लॉकडाउन सुरू असल्यामुळे पीएमआरडीएने शिवाजी चौकामध्ये हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान प्रस्तावित असणाऱ्या मेट्रोचे प्राथमिक काम हाती घेतले आहे. आयटी पार्कला जोडणारे पर्यायी रस्ते अद्याप तयार झालेले नसल्यामुळे आयटी पार्कमध्ये ये-जा करण्यासाठी शिवाजी चौकातील मुख्य रस्त्याचा वापर करावा लागतो. आयटी कंपन्या सुरू असताना सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत या चौकामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, वर्षभरापूर्वी पोलिसांनी या भागातील वाहतुकीत सुरळीतपणा आणण्यासाठी इथे चक्राकार वाहतुकीचा प्रयोग राबवला होता. मात्र, आता मेट्रोचे काम सुरू झाल्यामुळे या चौकामध्ये पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसणार आहे. मॉन्सून तोंडावर आहे, त्यामध्ये आयटी पार्कसाठी असणाऱ्या पर्यायी रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आगामी काळात आयटीयन्सना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आयटीयन्स म्हणतात...

आयटी कंपन्यांमधील कर्मचारी सध्या 'वर्क फ्रॉम होम' करत आहेत. मात्र, लॉकडाउनमध्ये हळूहळू शिथिलता येत आहे. त्यामुळे आगामी दीड ते दोन महिन्यांच्या अवधीत आयटी पार्कमधल्या कंपन्या सुरू होऊ शकतात. या सर्व बाबींचा विचार करता शिवाजी चौकामध्ये सुरू असणारे मेट्रोचे काम लवकर पूर्ण केले, तर आयटीयन्सना त्याचा त्रास होणार नाही. मात्र, काम धिम्यागतीने सुरू राहिल्यास इथल्या वाहतूकीवर त्याचा परिणाम होउ शकतो, असे मत केदार तुंगीकर या अभियंत्यांने व्यक्‍त केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivaji Chowk in Hinjewadi will be annoyng to IT employees