Video : ते निघाले परत न येण्याच्या तयारीतचं; पिंपरीतून आज किती परप्रांतीय परतले, बघा...

सुवर्णा नवले
Monday, 25 May 2020

- पिंपरीच्या 650 जणांची सुखरूप घरवापसी
- तब्बल दोन महिन्यानंतरची प्रतिक्षा संपली

पिंपरी : ना हाताला काम... ना खिशात पैसा... ना दोनवेळ पोटभर अन्न... त्यात मुलांची उपासमार.... अशा हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असलेले 650 परप्रांतीय अखेर दोन महिन्यानंतर पिंपरी-चिंचवडहून उत्तर प्रदेशला सोमवारी (ता. 25) विशेष रेल्वेने रवाना झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पीएमपीच्या वतीने लॉकडाउनमध्ये अडकलेल्या परप्रांतीयांना सोडण्यासाठी सकाळी सहा, दहा व दुपारी बारा वाजता भोसरी, निगडी व पिंपरी डेपोवरून विनाशुल्क 107 बस पुणे स्टेशनपर्यंत देण्यात आल्या होत्या. एका बसमध्ये 22 ते 25 जणांची बैठक व्यवस्था केली होती. उरुळी कांचन व पुणे स्टेशनवरून दुपारी 12 व तीन वाजता, अशा दोन सत्रात या रेल्वे निघाल्या. पिंपरी डेपोतून 56 व निगडी डेपोतून 51 बसगाड्या देण्यात आल्या होत्या. यातील उर्वरित प्रवासी बिहार गोपाळगंज, कटिहार व गोरखपूरला जाणारे देखील होते.

भोसरी, वाकड, दिघी, तळेगाव दाभाडे, चिंचवड, म्हाळुंगे पोलिस ठाण्यामधून सर्वांची कागदपत्रे पडताळणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना आसन क्रमांक देण्यात आले. यादरम्यान, पोलिस व पीएमपी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती. तत्पूर्वी वाहनांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. त्यानंतर सर्वांना खाण्याच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. यातील काहींनी पुन्हा न परतण्याच्या तयारीतच सामानाची बांधाबांध केली होती. महिलांच्या चेहऱ्यावर घरी जाण्याचा उत्साह ओसंडून वाहत होता. तर दुसरीकडे तोंडाला मास्क व वारंवार सॅनिटायझरही लावताना नागरिक दिसत होते. दोन दिवसानंतर हे प्रवासी आपल्या कुटुंबीयांमध्ये असणार आहेत.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यापूर्वी बऱ्याच जणांनी पोलिस ठाण्याला हेलपाटे मारून वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी खटाटोप केला होता. याशिवाय पासच्या परवानगीसाठीदेखील पोलिस ठाण्याला हेलपाटे मारले होते. काहींनी यातील पायीच घरची वाट धरण्याचा निश्‍चय देखील केला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

"गेल्या दोन महिन्यांपासून आमचे खूप हाल झाले. हाताला कामदेखील नव्हते. कुटुंबातील सदस्य वैतागून गेले होते. गावाकडे आमची सर्वजण काळजी करीत आहेत. पुन्हा परतण्याचा अद्यापपर्यंत विचार केला नाही. मात्र, आमच्या घरी आम्ही सुखरूप जात आहोत याचा आम्हाला विशेष आनंद आहे. पोलिस, पीएमपी व रेल्वे प्रशासन सर्वजण आमची काळजी घेत आहेत.
"
- महेंद्र शुक्‍ला, रहिवासी, उत्तर प्रदेश 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six hundred fifty migrants people toward uttar pradesh from pimpri chinchwad by train