
Crime News : प्रेयसीबाबत वाईट शब्द उच्चारल्याने मुलाने केला वडिलांचा खून
पिंपरी : प्रेयसीबाबत वाईट शब्द उच्चारल्याच्या रागातून मुलानेच वडिलांचा गळा आवळून खून केला. दुसऱ्या मुलाने गळफास घेतल्याचा बनाव रचला तर मृताच्या पत्नीने पुरावा नष्ट केला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. ही घटना दिघी येथे घडली.
अशोक रामदास जाधव (वय ४५, रा. दिघी) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी अशोक यांचा मोठा मुलगा राहुल अशोक जाधव (वय २५) व लहान मुलगा अनिल अशोक जाधव (वय २३) व अशोक यांच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.
अनिल याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. त्या तरुणीबाबत त्याचे वडील अशोक यांनी वाईट शब्द उच्चारले. याचा राग आल्याने अनिलने घरातील दोरीच्या सहाय्याने वडिलांचा गळा आवळून खून केला. त्यावेळी अशोक यांच्या नाक तोंडातून फरशीवर पडलेले रक्ताचे डाग त्यांच्या पत्नीने त्यांच्या अंगातील शर्टने पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
तसेच मोठा मुलगा राहुल याने घरातील दोरी फॅनला गुंडाळून अशोक यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचा बनाव रचला. दिघी पोलिसांनी तिघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता दहा मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.