जगण्याची धडपड : कुटुंबासाठी धावून आली सून; गहाण ठेवलं मंगळसूत्र

सुवर्णा नवले
रविवार, 24 मे 2020

- चहाच्या किटलीसाठी गहाण ठेवले मंगळसूत्र
- लॉकडाउनमध्ये कुटुंब जगविण्यासाठी धडपड 

पिंपरी : स्त्रीचा खरा ऐवज म्हणजे मणी-मंगळसूत्र. कुटुंबाची उपासमारीतून सुटका व्हावी, यासाठी सुनेने मंगळसूत्र गहाण ठेवून परिवारासाठी धाडसाचे पाऊल उचलले आहे. चहा विक्रीचा व्यवसाय अखंडपणे सुरू राहावा व लॉकडाउनमध्ये परिवाराचा उदरनिर्वाह व्हावा, यासाठी आलेल्या पैशातून अडीच लिटर चहाची किटली (थर्मास) विकत घेऊन तिने कुटुंब जगविले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चिंचवड येथे राहणारे लोखंडे कुटुंबीय. हातावरचे पोट. टपरीच्या व्यवसायावर उदरनिवार्ह होत असे. मात्र, या व्यवसायास परवानगी नसल्याने अवघ्या अडीच हजार रुपयाच्या किटलीसाठी सून सरोजा लोखंडे यांच्यावर गळ्यातले मणी-मंगळसूत्र मोडण्याची वेळ आली. आणि त्यातून व्यवसाय टिकविण्यासाठी चहाची किटली खरेदी करावी लागली आहे. ही परिस्थिती एकट्या लोखंडे कुटुंबीयांची नव्हे. तर असंख्य मोल मजुरी करणाऱ्या महिला कामगारांची आहे. या महिलांवर कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी मंगळसूत्र गहाण ठेवण्याचे प्रसंग ओढवले आहेत. सध्या सराफाची दुकाने बंद असल्याने ओळखीच्या व्यावसायिकांकडे चार ते पाच हजार रुपयांपासाठी सोने गहाण ठेवले जात आहे. त्यातून कुटुंब जगत असल्याचे मन हेलावण्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.

सुनेच्या निर्णयामुळे पती कृष्णा लोखंडे व सासरे जयानंद लोखंडे यांना व्यवसायासाठी हातभार लागला. सध्या शहरात ठिकठिकाणी दारोदार फिरून त्यांनी चहा विक्री सुरू केली आहे. आधी त्यांना दिवसाकाठी पाचशे ते सातशे रुपये मिळत असे. सध्या दीडशे ते दोनशे रुपये ते कमवीत आहेत. त्यामुळे त्यांना घरखर्च भागविणे शक्‍य झाले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Image may contain: 1 person, standing, sunglasses, beard, drink and outdoor

लॉकडाउनच्या काळात रेशनच्या धान्यावरच त्यांनी कसेबसे दिवस काढले. मात्र, कुटुंब चालविणे अवघड होऊ लागल्याने त्यांनी चहाची किटली विकत घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. तरी देखील पोलिस येऊन दमबाजी करत असल्याचे प्रकार घडत असल्याने भयभीत होऊन ते इतरांची चहाची तलफ भागवीत आहेत.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सासरे जयानंद लोखंडे यांचे काही दिवसांपूर्वीच पोटाचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे घरात पैशांची चणचण आणखीनच भासली. त्यानंतर अचानक लॉकडाउन लागल्याने परिवारावर दुहेरी संकट ओढवले. यापूर्वी सर्व कुटुंब मिळून लिंबू सरबत, चहा, वडापाव व भजी विक्रीचा व्यवसाय ठिकठिकाणी करत असे. त्यातूनच कुटुंब टामटुमित सुरू असे. पती कृष्णा लोखंडे कंपनीत काम करत होते. त्यांचे कामही सध्या गेल्याने वडीलांसोबत ते रस्त्यावर थांबून मास्क व आंबे विक्री करत आहेत.

हार न मानता धैर्य दाखवायला हवे. खचून न जाता व्यवसायात सर्वांनी उभारी घ्यावी. आमच्या सारखेच कित्येक कुटुंबीयांचे हाल सुरू आहेत. त्यांच्यासाठी लवकरात लवकर व्यवसाय सुरू होणे अत्यावश्‍यक आहे. तरच कुटुंबे जगू शकतात.

- जयानंद लोखंडे, चहा विक्रेता, पिंपरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Struggle of a family selling tea to survive at pimpri