लोणावळ्याच्या उपनगराध्यक्षपदी सुधीर शिर्के  

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 November 2020

  • लोणावळा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी कॉंग्रेसचे सुधीर शिर्के यांची निवड झाली.

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी कॉंग्रेसचे सुधीर शिर्के यांची निवड झाली. उपनगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत भाजपच्या साथीने कॉंग्रेसने बाजी मारल्याचे चित्र लोणावळा नगरपरिषदेत बघायला मिळाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजपचे उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी पदाचा राजीनामा दिला. सोमवारी अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे सुधीर शिर्के यांनी भाजपच्याच गौरी मावकर यांचा चौदाविरुद्ध बारा मतांनी पराभव करीत उपनगराध्यक्षपदी बाजी मारली. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद सभागृहात निवडणूक प्रकिया पार पडली. मुख्याधिकारी रवी पवार यांनी सहायक म्हणून काम पाहिले. अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत कॉंग्रेसचे शिर्के यांचा तर भाजपच्या गौरी मावकर यांचे अर्ज दाखल झाले. मात्र, कोणाचीही माघार न झाल्याने उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली.

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर पदासाठी भाजपचा उमेदवार ठरला

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजपच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, देविदास कडू, ब्रिंदा गणात्रा, रचना सीनकर, सहयोगी सदस्य राजू बच्चे, मंदा सोनवणे, आरपीआयचे दिलीप दामोदरे तर कॉंग्रेसचे सदस्य आरोही तळेगावकर, संध्या खंडेलवाल, सुवर्णा अकोलकर, पूजा गायकवाड, संजय घोणे यांनी शिर्के यांना तर गौरी मावकर यांच्या बाजूने शिवसेनेच्या शादान चौधरी, सिंधू परदेशी, कल्पना आखाडे, शिवदास पिल्ले, माणिक मराठे, सुनील इंगुळकर, भाजपचे सदस्य भरत हरपुडे, अपर्णा बुटाला, जयश्री आहेर, अपक्ष नगरसेविका सेजल परमार, अंजना कडू यांनी मतदान केले. लोणावळ्यात कोरोनाचा फैलाव रोखण्याबरोबर प्रलंबित विकासकामांना गती देणार असल्याचे शिर्के यांनी निवडीनंतर सांगितले. 

भाजपच्या 'व्हीप'ला वाटाण्याच्या अक्षता 

भाजपचे गटनेते देविदास कडू यांनी कॉंग्रेसचे सुधीर शिर्के यांना मतदान करण्यासाठी भाजपच्या सदस्यांना व्हीप बजाविण्यात आला होता. मात्र, भाजपचे भरत हरपुडे, अपर्णा बुटाला, जयश्री आहेर, गौरी मावकर आदींनी "व्हीप'ला वाटाण्याच्या अक्षता लावत गौरी मावकर यांना शिर्के यांच्या विरोधात रिंगणात उतरवले. त्यामुळे भाजप पक्षनेतृत्वापुढे आव्हान निर्माण केले. 

'कॉंग्रेसला मतदान हीच पक्षविरोधी कृती' 

राज्यात, देशात कॉंग्रेस भाजपच्या विरोधात आहे. उपनगराध्यक्षपदासाठी कॉंग्रेसच्या उमेदवाराला मतदान करायला लावणे यासंदर्भात संशय निर्माण होत असून, कॉंग्रेसला मतदान करणे हीच पक्षविरोधी कृती असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या नगरसेविका अपर्णा बुटाला यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sudhir shirke as deputy mayor of lonavla