लोकसमर्पित दादा

Ajit-Pawar-and-Sunetra-Pawar
Ajit-Pawar-and-Sunetra-Pawar

काही व्यक्तींचे जीवन समाजासाठीच सातत्याने वाहून घेतलेले असते, त्यांचा प्रत्येक क्षण समाजकारणासाठीच व्यतित होत असतो. ज्या समाजाने आपल्याला घडवले, मोठे केले. त्या समाजाचा काही अंशी तरी उतराई व्हावी, या ध्येयाने काही जण झपाटलेले असतात. त्यातीलच एक म्हणजे आदरणीय अजितदादा. गेल्या दोन तपांहून अधिक काळ दादांसमवेत आहे. त्यांच्या स्वभावाचे विविध पैलू आज उलगडताना त्यांचा जुना काळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून जात आहे. आजच्या युवा पिढीला अजितदादांचे ग्लॅमर दिसते, मात्र, त्यांनी केलेले कष्ट व आजही त्यांच्याकडून वेळेचे भान न ठेवता केले जाणारे काम दिसत नाही. गेल्या तीन दशकात त्यांनी केलेल्या प्रचंड कष्टाची मी साक्षीदार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अजित दादांबाबत अनेकदा अनेक स्तरावर वेगवेगळी चर्चा होते. काही वेळा जहाल टीकेला त्यांना सामोरे जावे लागते. तर अनेकदा त्यांच्या कार्यशैलीचे कौतुकही केले जाते. त्यांचा स्वभाव कडक शिस्तीचा आहे. तरीही ते कमालीचे हळवे व मृदू आहेत. त्यांच्या मनामध्ये एक हळवा कोपरा असतो आणि प्रत्येकाला काहीतरी मदत करण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो.

अनेकदा त्यांच्या कडक स्वभावाच्या चर्चा अधिक होतात. पण जे काम होण्यासारखे असेल तेथे ते काम त्वरेने कसे मार्गी लागेल, याचा ते मनापासून प्रयत्न करतात. प्रसंगी ते रागावतात, चिडतात. पण, काही क्षणातच राग विसरुन समोरच्या व्यक्तीचे कामही तेच करून देतात, हे मी असंख्य वेळा पाहिलेले आहे.

आज त्यांनी राजकारण आणि समाजकारणात जी उंची गाठली आहे, त्याने अनेकदा लोक हे विसरून जातात की तेही एक माणूसच आहेत. पहाटे पाच वाजल्यापासून सुरू होणारा त्यांचा दिवस रात्री उशिरा भेटीगाठीनंतर संपतो. साहजिकच अनेकदा अनेक विविध स्वभावाच्या लोकांशी त्यांचा संपर्क येत असल्याने काहीशी चिडचिडही होते. मात्र, तरीही काम मार्गी कसे लागेल, याचाच त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो.

अंगी नेटकेपणा
अस्वच्छता त्यांना अजिबात खपत नाही. टापटीप व नीटनेटकेपणा हा त्यांचा गुण प्रत्येकाने घेण्यासारखा आहे. जे काम करायचे ते व्यवस्थित करायचे, हा त्यांचा शिरस्ता असतो. अनेकांना गबाळेपणासाठी त्यांची बोलणी खावी लागतात. अर्थात प्रत्येकाने नेटके असावे, हा त्यांचा त्या मागचा चांगला हेतू असतो. दररोज असंख्य कागदपत्रे येत असली तरी प्रत्येक कागद हव्या त्या वेळेस सापडलाच पाहिजे, हा त्यांचा आग्रह असतो. त्यामुळे एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लाजवेल, असा नेटकेपणा त्यांच्या अंगी आहे.

कुटुंबासाठी देतात आवर्जून वेळ
सहकारी साखर कारखान्याचे संचालक, खासदार, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेटमंत्री, उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांची वाटचाल झाली. कामाचा व्याप सातत्याने वाढतच गेला. मात्र, या व्यापातूनही कुटुंबीयांसाठी वेळ देण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात. दिवाळीत बारामतीत पवार कुटुंबीय एकत्र असते. तेव्हाही त्यांची कामे व सार्वजनिक कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरुच राहतात. मात्र, त्यातूनही ते कौटुंबिक स्तरावर आवर्जून वेळ काढत घरची जबाबदारीही समर्थपणे सांभाळतात.

प्रत्येक मतदार कुटुंबाचा घटकच
केवळ वैयक्तिकच नाही तर नातेवाईकांच्याही प्रत्येक कुटुंबावर व त्यातील प्रत्येक सदस्यावर त्यांचे बारकाईने लक्ष असते. काय हवं नको ते पाहत सातत्याने प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. मोठी जबाबदारी खांद्यावर असल्याने कुटुंबासाठी त्यांना पुरेसा वेळ देता येत नाही, याची खंत त्यांना कायमच असते. मात्र, आपल्याला ज्या लोकांनी निवडून दिले आहे, जबाबदारी सोपविली आहे, त्यांच्या प्रती आपली कर्तव्यभावना आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी आपण दिवसरात्र झटले पाहिजे, असेच त्यांना वाटत राहते. ज्यांनी निवडून दिलेले आहे, तेच माझ कुटुंब असे समजूनच सातत्याने ते लोकांसाठीच कार्यरत राहतात.

निर्णय घेतात आणि जबाबदारीही
निर्णयक्षमता हा त्यांचा आणखी गुण. त्यांच्याइतका झटपट व अचूक निर्णय फार कमी लोक घेऊ शकतात. अनेक महत्वाच्या व जटील विषयात जागेवर योग्य निर्णय घेताना मी त्यांना अनेकदा पाहिले आहे. इतरांच्या दृष्टीने किचकट वाटणाऱ्या विषयांवर ते लीलया आणि खंबीरपणे निर्णय घेतात, यातही महत्वाचे म्हणजे एकदा निर्णय घेतल्यावर त्या निर्णयाची जबाबदारी ते सर्वस्वी स्वतःवर घेतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. रस्ते रुंदीकरण, अतिक्रमण काढणे,  अगदी पुण्यातील उड्डाणपूल पाडण्याचा विषय असो. व्यापक जनहितासाठी प्रसंगी वाईटपणा स्वीकारून ते धाडसी निर्णय घेतात. लोकांनाही तो निर्णय कालांतराने पटतो, पण त्या क्षणी त्यांना वाईटपणा येतो.

कार्यकर्त्यांचे पालकत्व स्वीकारतात
आज राज्याच्या कानाकोपऱ्यातील असंख्य कार्यकर्ते त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात आणि यातील प्रत्येक कार्यकर्त्यांची काळजी ते आवर्जून घेतात. त्यांच्या सुख-दुःखाच्या प्रसंगी ते मदतीला धावून गेले आहेत. नवीन गाडी आणलेली असो किंवा एखादी इमारत उभारली असो, उद्‌घाटन असो वा दवाखान्यात आलेली अडचण असो. आपले दादा आपल्या पाठीशी आहेत, ही एकच भावना कार्यकर्त्यांच्या मनात असते आणि दादाही संकटसमयी एखाद्या मोठ्या भावासारखे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले मी पाहिले आहेत. आजपर्यंत अक्षरशः हजारो कार्यकर्त्यांच्या दवाखान्याच्या अडचणीच्या प्रसंगी दादा मदतीला धावून जातात. वैयक्तिक स्तरावरही जमेल तितकी मदत करतात. अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी जिवाचे रान करताना मी त्यांना अनेकदा पाहिले आहे. जिवाभावाचा कार्यकर्ता सर्वांना सोडून निघून जातो, तेव्हा त्यांना होणारे दुःख आणि त्या कार्यकर्त्याची भासणारी कमतरता, त्यांचा त्या वेळी होणारा कातर स्वर हेही आम्ही अनुभवतो. समाजासाठी काहीतरी करण्याचा ध्यास बाळगूनच त्यांचे काम सुरू असते. सत्तेत असो वा नसो, लोकांसाठी जीवन जगणे हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे. सातत्याने लोकसेवेसाठी जीवन समर्पित केलेल्या आदरणीय दादांना वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा. त्यांना परमेश्वराने उदंड आयुष्य देवो.
(शब्दांकन - मिलिंद संगई, बारामती.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com