प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या 'लालपरी'बाबत 'हे' पहिल्यांदाच घडलंय!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत, 1 जूनला दरवर्षी राज्यातील प्रत्येक स्थानकावर एसटीचा वर्धापनदिन उत्साहाने साजरा केला जात असतो.

पिंपरी : आकर्षक रांगोळ्या, सुमधूर संगीत आणि गुलाबाची फुले देऊन दरवर्षी साजरा होणारा राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) वर्धापनदिन यंदा पहिल्यांदाच साजरा झाला नाही. वल्लभनगर एसटी स्थानकावर पूर्णपणे शुकशुकाट राहिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत, 1 जूनला दरवर्षी राज्यातील प्रत्येक स्थानकावर एसटीचा वर्धापनदिन उत्साहाने साजरा केला जात असतो. स्थानकाची स्वच्छता करून आकर्षक रांगोळ्या काढल्या जातात. प्रवाशांना गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले जाते. आगार व्यवस्थापक, इतर अधिकारी, चालक-वाहक आदी त्यामध्ये, उत्साहाने भाग घेत असतात. वर्षभर उत्तमरित्या काम केलेल्या कामगारांचे कौतुक केले जाते. त्यांचा मान-सन्मान केला जातो. मात्र, यंदाच्या वर्षी प्रथमच हे घडले नाही. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महामंडळाचे वल्लभनगर एसटी स्थानकावर शुकशुकाट राहिला. पूर्वीसारखी प्रवाशी, चालक-वाहक यांची लगबग दिसली नाही. आगाराचे प्रवेशद्वार सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहिले. सर्व बसगाड्या जागेवरच उभ्या होत्या. लॉकडाउनच्या काळातदेखील एसटीने माणुसकी सोडली नाही. शहरात अडकलेल्या सुमारे 2 हजारांहून परप्रांतीय लोकांना घेऊन एसटी राज्याच्या सीमेपर्यंत धावली. कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड,आंध्र प्रदेशच्या गोरगरीब, स्थलांतरित कामगार यांना सुखरूप नेऊन सोडले. मात्र, त्यानंतर रेल्वे सुरू झाल्यावर एसटीवरील ताण कमी होत गेला. सध्या पोलिसांच्या मागणीनुसार, केवळ पुणे आणि ऊरूळी कांचन रेल्वे स्थानकावर परप्रांतीय लोकांना सोडले जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वल्लभनगर एसटी आगार व्यवस्थापक सुनील हिवाळे म्हणाले, "एसटीचा आज (सोमवार) 72 वा वर्धापनदिन आहे. मात्र, तो साजरा केला जाऊ नये, असे पत्र विभागीय कार्यालयाकडून आले आहे. त्यामुळे यंदा वर्धापनदिन साजरा केला जाणार नाही. गेल्या कित्येक वर्षांत पहिल्यांदाच हे असे होत आहे. सर्व सामान्य प्रवाशांसाठी एसटी सुरू झाली नसली, तरी परप्रांतीय लोकांसाठी पोलीसांच्या मागणी नुसार गाड्यांची व्यवस्था केली जात आहे." 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today is the anniversary of ST bus depo vallabhnagar